मोदी सरकारला शाबासकी
By Admin | Updated: June 5, 2015 01:14 IST2015-06-05T01:14:33+5:302015-06-05T01:14:33+5:30
भारतात जे बदल होत आहेत त्यामुळे जगात देशाचे स्थान व प्रतिष्ठा वाढत आहे,या शब्दांत खुद्द सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनीच सरकारला शाबासकीची थाप दिली आहे.
मोदी सरकारला शाबासकी
नागपूर : मोदी सरकारच्या एक वर्षाच्या कामगिरीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे समाधान व्यक्त करण्यात आले आहे. भारतात जे बदल होत आहेत त्यामुळे जगात देशाचे स्थान व प्रतिष्ठा वाढत आहे,या शब्दांत खुद्द सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनीच सरकारला शाबासकीची थाप दिली आहे.
संघाच्या तृतीय वर्ष शिक्षा वर्गाचा गुरुवारी सायंकाळी रेशीमबाग मैदान येथे समारोप झाला. याप्रसंगी कार्यक्रमाचे मुख्य अतिथी कर्नाटकच्या धर्मस्थळ येथील धर्माधिकारी डॉ.वीरेंद्र हेगडे, डॉ.मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. सत्ताबदलानंतर देशात सकारात्मक बदलांचा जनतेला अनुभव होत आहे. जगात भारत क्रमांक एकवर नसला तरी आपल्याबद्दल इतर देशांच्या आशाआकांक्षा वाढल्या आहेत. जगाला भारताबाबत विश्वास आहे व भविष्यातील महाशक्ती म्हणून भारताचेच नाव सर्वात प्रथम घेतल्या जात आहे. आपल्या देशाकडून स्वत:च्या स्वार्थाचा ‘अजेंडा’ कधीही राबविण्यात आलेला नाही. देश मोठा होत आहे, कारण येथे तसे कर्तृत्व असणाऱ्या व्यक्ती आहेत, असे डॉ. भागवत म्हणाले.
मी गेल्या अनेक वर्षांपासून देशात होणारे बदल पाहतो आहे. येथे सर्वसमानतेचा भाव वाढत आहे. राजकीय पक्षांनी आपापल्या भूमिका सांभाळायला पाहिजेत. परंतु देशहितासाठी राष्ट्रीयभावाला प्राधान्य देत सर्वांनी एकत्रित यायला हवे, असे मत डॉ.हेगडे यांनी व्यक्त केले.
यावेळी मंचावर वर्गाचे सर्वाधिकारी गोविंदसिंह टांक, महानगर संघचालक राजेश लोया हे उपस्थित होते. या कार्यक्रमाला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय माहिती व नभोवाणी राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड आदी उपस्थित होते.
यंदाचा तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्ग ११ मे पासून सुरू झाला. या वर्गात देशभरातून १८ ते ४० वर्षे वयोगटातील ८७६ स्वयंसेवक सहभागी झाले होते. या स्वयंसेवकांनी सुरुवातीलाविविध शारीरिक प्रात्यक्षिके सादर केली. यानंतर घोष प्रात्यक्षिकेही सादर करण्यात आली. (प्रतिनिधी)
सर्वसमानतेचा भाव
मी गेल्या अनेक वर्षांपासून देशात होणारे बदल पाहतो आहे. येथे सर्वसमानतेचा भाव वाढत आहे. राजकीय पक्षांनी आपापल्या भूमिका सांभाळायला पाहिजेत. परंतु देशहितासाठी राष्ट्रीयभावाला प्राधान्य देत सर्वांनी एकत्रित यायला हवे, असे मत डॉ.हेगडे यांनी व्यक्त केले.