वीज संकटास केंद्रातील मोदी सरकारच जबाबदार
By Admin | Updated: September 8, 2014 03:20 IST2014-09-08T03:20:24+5:302014-09-08T03:20:24+5:30
विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचार पुस्तिकांचे प्रकाशन करतेवेळी रविवारी महाराष्ट्रातील वीज संकटासाठी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच जबाबदार असल्याचे टीकास्त्र काँग्रेसने सोडले

वीज संकटास केंद्रातील मोदी सरकारच जबाबदार
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचार पुस्तिकांचे प्रकाशन करतेवेळी रविवारी महाराष्ट्रातील वीज संकटासाठी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच जबाबदार असल्याचे टीकास्त्र काँग्रेसने सोडले. गेल्या सोमवारी काँग्रेसच्या प्रचाराचा शुभारंभ करतानाही वीजसंकटावरून केंद्रावर हल्लाबोल करणाऱ्या राज्यातील काँग्रेसच्या प्रचाराचा रोख या मुद्यावरच राहील, असे संकेत मिळत आहेत.
देशासमोर सध्या अभूतपूर्व ऊर्जासंकट उभे आहे. सारा देश अंधारात बुडायची वेळ आली आहे. किमान आता तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपले नेतृत्वगुण दाखवावेत, असा टोला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी हाणला. त्यांच्या हस्ते या प्रचार पुस्तिकांचे प्रकाशन करण्यात आले.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे पडसाद ऊर्जा क्षेत्रात उमटू लागले आहेत. खासगी उत्पादकांनी वीज तयार करण्यास नकार दिला आहे. खुद्द गुजरातमध्ये ३५०० मेगावॅट विजेचा तुटवडा निर्माण झाल्याने भारनियमन करावे लागले, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, देशासमोरील संकटाला सर्वांनी एकत्रपणे सामोरे जाण्याची गरज आहे. किमान आता तरी पंतप्रधानांनी पुढे येऊन देशाला दिशा दाखवण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)