मोदी सरकार महाराष्ट्रविरोधी: सोनिया गांधी यांचा हल्लाबोल

By Admin | Updated: October 9, 2014 23:54 IST2014-10-09T23:50:07+5:302014-10-09T23:54:23+5:30

भाजप, शिवसेनेला पुन्हा थारा नको; कोल्हापुरात जाहीर सभा

Modi government is anti-Maharashtra: Sonia Gandhi's attack | मोदी सरकार महाराष्ट्रविरोधी: सोनिया गांधी यांचा हल्लाबोल

मोदी सरकार महाराष्ट्रविरोधी: सोनिया गांधी यांचा हल्लाबोल

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत देशातील जनतेला तुम्ही मोठमोठी स्वप्ने दाखवून फसविले. त्या प्रत्येक गोष्टीचे काय झाले, असा हिशेब मागितल्यावर तुम्ही हैराण का होता? अशी विचारणा काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांनी आज, गुरुवारी येथे झालेल्या विराट सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली. केंद्रातील भाजपचे सरकार महाराष्ट्रविरोधी निर्णय घेत आहे. महाराष्ट्रातील अनेक संस्था गुजरातला नेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ‘भाजप’चा निवडणुकीत एक रंग असतो व निवडून आल्यावर ते छुपा अजेंडा बाहेर काढतात. अशा रंग बदलणाऱ्या पक्षाला महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीत थारा देऊ नका, असे आवाहनही श्रीमती गांधी यांनी केले.
येथील मेरी वेदर मैदानावर झालेल्या या सभेला उन्हाचा तडाखा असतानाही प्रचंड गर्दी उसळली होती. सभेनंतर श्रीमती गांधी यांनी बॅरिकेटिंगवर चढून महिला व कार्यकर्त्यांशी हस्तांदोलन केल्याने कार्यकर्त्यांत चैतन्य पसरले. काँग्रेसच्या जयजयकाराने सभास्थळ दुमदुमून गेले. यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, लोकसभेतील पक्षाचे नेते मल्लिकार्जुन खरगे, महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, हर्षवर्धन पाटील, पतंगराव कदम, स्वराज्य वाल्मीकी,
माजी खासदार कल्लाप्पाणा आवाडे, आदी नेते व्यासपीठावर उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ही पहिली सभा आज दुपारी येथे झाली.
श्रीमती गांधी यांनी बारा मिनिटांच्या भाषणात भाजपवरच हल्लाबोल केला. शिवसेना-भाजपच्या राज्यातील यापूर्वीच्या सरकारचा अनुभव खंडणी वसुलीचा व भीतिदायक आहे.आताही ते दोघे स्वतंत्र लढत असले तरी आतून त्यांचे साटेलोटे आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांना पराभूत करा व राज्याच्या प्रगतीचा, विकासाचा रथ पुढे नेण्यासाठी काँग्रेसलाच पुन्हा स्वबळावर सत्ता द्या, असे आवाहन श्रीमती गांधी यांनी केले. त्या म्हणाल्या, केंद्रातील मोदी सरकार महाराष्ट्राच्या विरोधात निर्णय घेत आहे. या राज्यातील काही चांगल्या संस्था गुजरातला नेण्याचा त्यांचा डाव आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसच्या सरकारने जेव्हा अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्याला विरोध करणारे भाजपवाले आज त्यांच्याच नावाने महाराष्ट्रात मते मागत आहेत.

जाब विचारला तर हैराण का होता?
सरकारच्या शंभर दिवसांनंतर आम्ही त्याचा जाब विचारला तर त्याचे पंतप्रधानांना वाईट वाटते. तुम्ही पाकिस्तानला धडा शिकवणार म्हटला होता, त्याचे काय झाले? देशातील काळा पैसा बाहेर काढू, तरुणांच्या हाताला रोजगार देणार, असे तुम्ही जाहीर केले होते, त्याबद्दल विचारणा केल्यावर तुम्ही ज्यांनी ६० वर्षे या देशात राज्य केले, ते माझ्याकडे ६० दिवसांचा हिशेब मागत असल्याची टीका करीत आहात. माझा तुम्हाला असा खडा सवाल आहे की, तुम्ही मोठमोठी स्वप्ने दाखवून जनतेला फसविले. त्या प्रत्येक गोष्टीचा हिशेब मागितल्यावर तुम्ही हैराण का होत आहात? असेही सोनिया गांधी म्हणाल्या.

महाराष्ट्र गुजरातपेक्षा पुढेच
महाराष्ट्राला विकासाच्या बाबतीत गुजरातबरोबर नेण्याची भाषा भाजपकडून केली जात आहे. वाह! किती मजेशीर गोष्ट आहे बघा. या लोकांना एवढेही माहीत नाही की, महाराष्ट्र अनेक क्षेत्रांत गुजरातपेक्षा कितीतरी पटीने पुढे आहे. मोठ्या-मोठ्या बाता करतात खरे; परंतु नंतर त्यांची सत्यता कळून येते, अशा शब्दांत सोनिया गांधी यांनी भाजपच्या महाराष्ट्र विकासाच्या संकल्पनेची खिल्ली उडविली.

योजना त्याच; नावे बदलली
दुसऱ्यांच्या योजना आपल्या नावावर खपविण्यात तर भाजपच्या नेत्यांचा हात कुणी धरूच शकणार नाही. काँग्रेसच्या सरकारनेच ज्या योजना आतापर्यंत राबविल्या, त्याच नावे बदलून आम्हीच केल्या, असे पंतप्रधान जोरजोराने ओरडून सांगत आहेत.
वैज्ञानिकांनी रात्रीचा दिवस करून जे यश मिळवले, तेदेखील आपल्या पक्षामुळेच मिळाले, असा प्रचार भाजपकडून सुरू आहे. त्यांच्या अशा खोटारड्या प्रचाराला बळी पडू नका. देशातील शेतकरी, महिला, मागासवर्गीय, कमजोर वर्गांसाठी चांगल्या योजना कॉँग्रेसने राबविल्या. त्यातूनच देशाची प्रगती झाली. संपूर्ण जगात देशाचे नाव उंचावले आहे, असे सोनियांनी स्पष्ट केले.
लोकप्रेमाची आस...
कोल्हापुरातील सभा संपल्यानंतर सोनिया गांधी व्यासपीठावरून खाली उतरल्या. त्या व्यासपीठाच्या मागील बाजूस गाड्यांच्या ताफ्याकडे जात असताना उन्हातील महिलांची गर्दी पाहून त्यांना भेटण्यासाठी गतीने तिकडे वळल्या. त्यांच्यासोबतच्या सुरक्षा अधिकाऱ्यांची त्यामुळे चांगलीच तारांबळ उडाली. व्यासपीठाच्या दोन्ही बाजूंकडील महिला व पुरुषांना त्या अक्षरश: लाकडी बॅरिकेटिंगवर चढून भेटल्या. अनेकांशी त्यांनी हस्तांदोलनही केले. सगळ्यांना फिरून नमस्कार करीत अभिवादन केल्यानंतरच त्या वाहनाने विमानतळाकडे रवाना झाल्या. त्यांच्या या भेटीचे कार्यकर्त्यांना चांगलेच अप्रूप वाटले आणि त्यांच्यात चैतन्य पसरले. काल, बुधवारीही राहुल गांधी महाड येथे झालेल्या सभेत लोकांना गर्दीत जाऊन भेटले होते.

Web Title: Modi government is anti-Maharashtra: Sonia Gandhi's attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.