‘कॉमन मॅन’ला भावले मोदी
By Admin | Updated: August 22, 2014 01:34 IST2014-08-22T01:34:57+5:302014-08-22T01:34:57+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपुरातील पहिल्या भाषणातून शहरवासीयांना अनेक आशा-अपेक्षा होत्या. मोदी यांच्या भाषणानंतर त्या पूर्ण झाल्या की निराशा हाती आली, या विषयी अनेकांना बोलते केले.

‘कॉमन मॅन’ला भावले मोदी
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपुरातील पहिल्या भाषणातून शहरवासीयांना अनेक आशा-अपेक्षा होत्या. मोदी यांच्या भाषणानंतर त्या पूर्ण झाल्या की निराशा हाती आली, या विषयी अनेकांना बोलते केले. त्यावेळी काहींनी मोदींनी भाषणातून सामान्यांना जिंकले तर काहींनी स्वतंत्र विदर्भावर बोलायला हवे होते, अशा प्रतिक्रिया दिल्या.
देशाची काळजी जाणवली
पंतप्रधान मोदी यांच्या भाषणातून देशाची काळजी जाणवली. सामान्य माणसाला हेच अपेक्षित आहे. त्यांनी नष्ट होत चाललेली शेती, भ्रष्टाचार, बेरोजगारीवर बोट ठेवले.
-फिरोज अन्सारी
बेरोजगारांना दाखविले आशेचे किरण
मोदीजींनी आपल्या भाषणात विकासाला महत्त्व दिले. सोबतच त्यांनी कमी शिक्षण घेतलेल्या बेरोजगारांना आशेचा किरणही दाखविला. स्वत:च्या कलागुणांच्या जोरावर नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे शक्य आहे, असा सकारात्मक संदेश दिला.
-मोहम्मद जकी
महागाईवर बोलायला हवे होते
मोंदीजींचे भाषण ऐकण्यासाठी फार उत्सुक होतो. परंतु आज त्यांचे भाषण नेहमीप्रमाणे झालेले नाही. त्यांनी देशातील वाढत्या महागाईवर बोलायला हवे होते.
-दिगंबर जोशी
भाषणात एकसूरपणा होता
पंतप्रधानाचे आजचे भाषण रटाळ होते. नेहमीचा एकसूरपणा होता. त्यामुळे अनेक लोक त्यांचे भाषण सुरू झाल्यानंतर दहा मिनिटात बाहेर पडायला लागले.
-संजय कटरे
विदर्भावर बोलायला हवे होते
आजच्या घडीला संपूर्ण विदर्भ वेगळ्या विदर्भाच्या प्रतीक्षेत आहे. या धर्तीवर त्यांनी आपल्या भाषणात विदर्भाविषयीचे मत मांडायला हवे होते. विदर्भवाद्यांची घोर निराशा झाली.
-उमेश नारनवरे
भ्रष्टाचाराचा मुद्दा उचलला
देश भ्रष्टाचाराने पोखरून निघाला आहे. मोदीजींनी आपल्या भाषणात हा मुद्दा उपस्थित करून उपस्थितांची मने जिंकली. ते म्हणाले, या विषयी मी सामान्य लोकांसोबत आहे. त्यामुळे ज्यांना स्वत:ला बदलायचे आहे त्यांनी बदलावे, असा इशाराही दिला.
- जय चव्हाण
ओजस्वी भाषण नव्हते
पंतप्रधानांचे भाषण ओजस्वी असेच असावे. परंतु आजच्या भाषणात अनेक उणिवा होत्या. त्यांना येथील समस्या माहीत नसल्याचे दिसून आले. त्यांनी महागाई व बेरोजगारीवर बोलायला हवे होते.
-रेणुका चव्हाण
विकासावर भरभरून बोलले
विकासावर मोदीजी भरभरून बोलले. त्यांच्या भाषणात देशातील ५०० शहरांचा विकासापासून ते कृषीचा विकास हाच उद्देश असल्याचे दिसून आले. भ्रष्टाचारावरही सडकून टीका केली.
- सचिन रानडे
मोठा दिलासा मिळाला
‘पिछले साठ साल मे जिसको मौका मिला उसने धोका दिया’ हे त्यांच्या भाषणातील वाक्य बरेच काही सांगून गेले. एक मोठा दिलासा सामान्य माणसाला मिळाला.
-श्रुती खोब्रागडे
विदर्भाची घोषणा हवी होती
मोंदींनी आपल्या भाषणात स्वतंत्र विदर्भाची घोषणा करायला हवी होती. त्यांच्या पक्षाचीही हीच मागणी आहे. -सुनील जवादे