मोदी - उद्धव ठाकरेंच्या चर्चेनंतर अनिल देसाईंची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी
By Admin | Updated: November 9, 2014 11:52 IST2014-11-09T11:50:35+5:302014-11-09T11:52:03+5:30
शिवसेना खासदार अनिल देसाई यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार असून थोड्याच वेळात देसाई दिल्लीत पोहोचणार आहेत.

मोदी - उद्धव ठाकरेंच्या चर्चेनंतर अनिल देसाईंची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ९- शिवसेना खासदार अनिल देसाई यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार असून थोड्याच वेळात देसाई दिल्लीत पोहोचणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरेंशी दोन वेळा दुरध्वनीद्वारे चर्चा केल्यानंतर अनिल देसाई दिल्लीला रवाना झाल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र यात मोदींनी उद्धव ठाकरेंना नेमके कोणते आश्वासन दिले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आज होणार असून यामध्ये शिवसेनेच्या वाट्यालाही मंत्रिपद येणार आहे. यासाठी शिवसेनेतर्फे अनिल देसाई यांची शिफारस करण्यात आली असली तरी शिवसेना - भाजपामध्ये चर्चेचे गु-हाळ सुरुच असल्याने शिवसेनेच्रया सहभागाविषयी संभ्रमाचे वातावरण होते.रविवारी सकाळी अनिल देसाई दिल्लीकडे रवाना झाले व त्यामुळे देसाई यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाईल हे स्पष्ट झाले आहे. शिवसेनेकडून सुनील प्रभू यांचीही मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे.
गेल्या २४ तासांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरेंशी दोन वेळा दुरध्वनीद्वारे चर्चा केली. यामध्ये ठाकरेंनी मोदींकडे नेमक्या कोणत्या मागण्या केल्या व मोदींनी त्यावर काय आश्वासन दिले हे समजू शकलेले नाही. उद्धव ठाकरेंनी केलेल्या मागण्यांविषयी मोदींनी राजनाथ सिंह आणि नितीन गडकरींसोबतही चर्चा केल्याचे समजते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हे दोन्ही दिल्लीकडे रवाना झाला असून शिवसेनेविषयी हे दोन्ही नेते पक्षश्रेष्ठींशी चर्चा करतील.
राष्ट्रवादीसोबत आल्यास वेगळा निर्णय
राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतल्यास आम्ही वेगळा निर्णय घेऊ अशी अटच शिवसेनेने भाजपासमोर ठेवल्याचे समजते.