कारागृहात होणार आधुनिक शेती
By Admin | Updated: August 21, 2014 22:17 IST2014-08-21T20:31:25+5:302014-08-21T22:17:28+5:30
बंदीजनांना मिळणार उन्नत यंत्रसामग्री

कारागृहात होणार आधुनिक शेती
बुलडाणा: राज्यातील विविध कारागृहात बंदीजनांकडून केल्या जाणार्या पारंपरिक शेतीला आता आधुनिक पद्धतीत रूपांतरीत करण्यात येणार आहे. राज्यातील निवडक १९ कारागृहात असलेल्या शेतीसाठी उन्नत अशी यंत्रसामग्री व अवजारे मिळणार आहे.
या उपक्रमांतर्गत विदर्भातील बुलडाणा, अकोला आणि यवतमाळ येथील जिल्हा कारागृह, नागपूर आणि अमरावती येथील मध्यवर्ती कारागृह तसेच मोर्शी येथील खुले कारागृहाला लाभ मिळणार आहे. विदर्भातील या कारागृहांसाठी ३५ लाख ४४ हजार ७६१ रुपयाचा खर्च अपेक्षीत आहे.
वेगवेगळ्या गुन्ह्यात शिक्षा झालेल्या कैद्यांमार्फत राज्यातील बहुतांश कारागृहात शेती फुलविण्यात आली आहे. या कामापोटी काही रक्कम त्यांना मानधन म्हणून दिली जाते. पारंपरिक पद्धतीने ही शेती केली जात होती. परंतु, आता शेतीच्या तंत्रात बदल करण्याकडे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतीचे उत्पन्न वाढविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. आधुनिक शेतीसाठी विविध प्रकारची यंत्रसामग्री व अवजारांचा वापर केला जातो. त्याचा सविस्तर विचार करून कोणत्या कारागृहात कोणती सामग्री लागेल याची आखणी करून मान्यता देण्यात आली आहे.
** राज्यातील १९ कारागृहांमध्ये आधुनिक शेती करण्यासाठी ९७ लाख ५0 हजार रुपये खर्च करण्यात येणार आहे. त्यात पॉवर स्प्रे, सबसर्मिबल पंप, कृषी व्हेंटर, पेरणी यंत्र, ट्रॅक्टर, अन्नधान्य वाहतुकी टेम्पो, कडबाकुट्टी यंत्र, कल्हीव्हेटर, पॉवर टिलर, दोन फाळी नांगर, खत-बी पेरणी यंत्र, रोटो व्हेटर, वखर, स्वयंचलित पेरणी यंत्र, नारळ शिडी, लोखंडी बैलगाडी, सायकल कोळपे आदी सामग्रीचा समावेश आहे.