मराठवाड्यात मध्यम प्रकल्प कोरडे!

By Admin | Updated: February 20, 2015 01:16 IST2015-02-20T01:16:33+5:302015-02-20T01:16:33+5:30

मराठवाडा विभागात लहान आणि मध्यम धरणांतील पाणी साठ्याची परिस्थिती चिंताजनक बनली असून फेबु्रवारीमध्येच ७५ मध्यम प्रकल्पांपैकी ३५ मध्यम प्रकल्प कोरडे पडले आहेत.

Moderate projects dry in Marathwada! | मराठवाड्यात मध्यम प्रकल्प कोरडे!

मराठवाड्यात मध्यम प्रकल्प कोरडे!

औरंगाबाद : मराठवाडा विभागात लहान आणि मध्यम धरणांतील पाणी साठ्याची परिस्थिती चिंताजनक बनली असून फेबु्रवारीमध्येच ७५ मध्यम प्रकल्पांपैकी ३५ मध्यम प्रकल्प कोरडे पडले आहेत.
उर्वरित ४० प्रकल्पांमध्येही जेमतेम पाणीसाठा आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाणी टंचाई आणखी तीव्र होणार आहे. मराठवाड्यात सलग तिसऱ्या वर्षीही दुष्काळी परिस्थिती ओढवली आहे. पुरेशा पावसाअभावी विभागातील बहुतेक प्रकल्पांमध्ये यंदा आधीच पाणीसाठी कमी होता.
मराठवाड्यात एकूण ७५ मध्यम प्रकल्प आहेत. त्यातील ३५ प्रकल्पांतील उपयुक्त जलसाठा आजघडीला पूर्णपणे संपला आहे. बीड जिल्ह्यातील सर्वाधिक १६ पैकी ११ मध्यम प्रकल्प कोरडे आहेत. त्यापाठोपाठ औरंगाबाद जिल्ह्यातील १६ पैकी ९, लातूरमधील ८ पैकी ३, जालन्यातील ७ पैकी ४, तर उस्मानाबाद जिल्ह्यातील १७ पैकी ६ प्रकल्प कोरडे आहेत. परभणी जिल्ह्यात दोन मध्यम प्रकल्प असून, या दोन्ही प्रकल्पांतही जेमतेम ६ टक्केउपयुक्त साठा शिल्लक राहिला आहे. (प्रतिनिधी)
लघु प्रकल्पात ११ टक्केच साठा
मराठवाड्यातील लघु प्रकल्पांची अवस्थाही तितकीच वाईट असून सरासरी अवघा ११ टक्केच साठा शिल्लक आहे. मराठवाड्यात एकूण ७२० लघु प्रकल्प आहेत. यातील ७० टक्के प्रकल्प पूर्णपणे रिकामे झाले आहेत. गतवर्षी मराठवाड्यातील लघु प्रकल्पांमध्ये फेब्रुवारीत सरासरी १४ टक्के साठा होता. यंदा तो ११ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.
जायकवाडीत २३ टक्के साठा
मराठवाड्यात ११ मोठे प्रकल्प आहेत. त्यातील माजलगाव, मांजरा, निम्न तेरणा आणि सिना-कोळेगाव प्रकल्पांतील उपयुक्त साठा पूर्णपणे संपलेला आहे. सर्वात मोठ्या जायकवाडी धरणात जेमतेम २३ टक्के साठा आहे. येलदरीत २०, सिद्धेश्वरमध्ये ४२, ऊर्ध्व पेनगंगात ४१, निम्न मनारमध्ये ११, विष्णूपुरी ३१ आणि निम्न दुधनात ३७ टक्के उपयुक्त साठा शिल्लक आहे.

 

Web Title: Moderate projects dry in Marathwada!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.