मोबाइल तिकीट सेवा ‘स्लो ट्रॅक’वर
By Admin | Updated: January 30, 2015 05:13 IST2015-01-30T05:13:01+5:302015-01-30T05:13:01+5:30
रेल्वेचे तिकीट प्रवाशांना सहज उपलब्ध व्हावे यासाठी रेल्वेने आणलेली मोबाइल तिकीट सेवा सुरू होऊन एक महिना उलटला तरी

मोबाइल तिकीट सेवा ‘स्लो ट्रॅक’वर
मुंबई : रेल्वेचे तिकीट प्रवाशांना सहज उपलब्ध व्हावे यासाठी रेल्वेने आणलेली मोबाइल तिकीट सेवा सुरू होऊन एक महिना उलटला तरी ती स्लो ट्रॅकवर जात असल्याचे दिसत आहे. या सेवेला मध्य रेल्वेमार्गावरील प्रवाशांकडून थंड प्रतिसाद मिळत असून, एका महिन्यात अवघे १८ हजार रुपये उत्पन्न मिळाले आहे.
२७ डिसेंबर रोजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते दादर स्थानकात मोबाइल अॅपचा शुभारंभ करण्यात आला आणि या दिवसापासून प्रवाशांना सेवा देण्यास सुरुवात झाली. रेल्वेच्या क्रिसकडून (सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीम) मोबाइल तिकीट सेवा उपलब्ध करण्यासाठी स्वतंत्र अॅप तयार करण्यात आले आहे. २७ तारखेपासून सुरू झालेल्या या सेवेला पहिल्या तीन दिवसांत तर अत्यल्प प्रतिसाद मिळाला. अवघ्या ३२ जणांनीच यूटीएस बुकिंग काउंटरवरून रिचार्ज केले आणि यातून ५९ तिकिटांची विक्री झाली. या तिकीट विक्रीतून रेल्वेला अवघे ४३0 रुपये उत्पन्न मिळाले. यात मध्य रेल्वेमार्गावर ४९ तिकिटांची तर पश्चिम रेल्वेमार्गावर उर्वरित १0 तिकिटांची विक्री झाली होती. आतापर्यंत मध्य रेल्वेवर १ हजार ७८ तिकिटे काढण्यात आली आहेत. (प्रतिनिधी)