येरवड्याच्या अंडासेलमध्ये मोबाईल !

By Admin | Updated: May 8, 2014 08:32 IST2014-05-08T08:28:47+5:302014-05-08T08:32:12+5:30

येरवडा कारागृहाच्या अतिसुरक्षा विभागात (अंडासेल) कुख्यात शरद मोहोळ टोळीतील एका सराईत गुन्हेगाराकडे मोबाईल सापडल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे.

Mobile phone in Yerwada's oval! | येरवड्याच्या अंडासेलमध्ये मोबाईल !

येरवड्याच्या अंडासेलमध्ये मोबाईल !

पुणे : राज्यात सर्वांत मोठे व सुरक्षित कारागृह समजल्या जाणार्‍या येरवडा कारागृहाच्या अतिसुरक्षा विभागात (अंडासेल) कुख्यात शरद मोहोळ टोळीतील एका सराईत गुन्हेगाराकडे मोबाईल सापडल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. कैद्यांना चांगले जेवण, मद्य, गाद्यागिरद्या आदी सुविधा काही तुरुंगाधिकार्‍यांच्या वशिल्याने पुरविल्या जात असल्याच्या तक्रारी होत्या. मात्र, आता मोबाईलचीही सुविधा त्यांना पुरविली जात असल्याचे स्पष्ट झाल्याने सुरक्षा यंत्रणेचे धिंडवडे निघाले असून, ढिसाळपणा उघड झाला आहे.

येरवडा कारागृहातील टोळ्यांशी संगनमत करून कैद्यांना विविध सेवा-सुविधा पुरविल्या जात असल्याचे प्रकरण ‘लोकमत’ने काही दिवसांपूर्वीच उजेडात आणले होते. कारागृह महानिरीक्षक विभागाच्या विशेष दक्षता पथकाकडून अचानक कैद्यांच्या बराकी व सामानांची झडती घेतली जाते. मंगळवारी रात्री अचानक विशेष दक्षता पथकाकडून अशीच तपासणी घेण्यात आली. अंडासेलमधील कैद्यांची झडती घेत असताना मोहोळ टोळीतील मुन्ना दावल शेख याच्याकडे मोबाईल आढळला. कारागृह महानिरीक्षक मीरा बोरवणकर यांना या प्रकाराची माहिती देण्यात आली. तसेच, येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तुरुंगाधिकार्‍यांच्या आशीर्वादाने कैद्यांना विशेष सुविधा पुरविल्या जात असल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला होता. विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी ही बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली आहे. मोबाईल अंडासेलपर्यंत पोहोचला कसा? कारागृहाच्या आतमध्ये कैद्यांना आणताना अत्यंत बारकाईने त्यांची झडती प्रवेशद्वारातील तुरूंगरक्षकांकडून घेतली जाते. कारागृहातील कर्मचारी व अधिकारी यांचीही झडती घेऊनच त्यांना आतमध्ये प्रवेश दिला जातो. तसेच, कारागृहाच्या आतमध्ये आणल्या जाणार्‍या सामानाचीही बारकाईने तपासणी केली जाते. अंडासेल हा कारागृहातील अत्यंत सुरक्षित विभाग समजला जातो. कुख्यात टोळयांमधील कैद्यांना याठिकाणी एकांतवासामध्ये ठेवले जाते. या कैद्यांवर कारागृह प्रशासनाकडून विशेष लक्ष दिले जाते. तरीही अंडासेलच्या आतमध्ये असलेल्या कैद्यापर्यंत मोबाईल पोहोचलाच कसा, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मोबाईल लपवून आणला असेल

कारागृह विभागाच्या झडतीमध्ये मुन्ना शेख याच्याकडे मोबाईल आढळून आला. एक महिन्यापासून त्याच्याकडे मोबाईल असावा, असे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. न्यायालयाच्या तारखेला गेला असताना त्याने त्या वेळी मोबाईल घेऊन लपवून कारागृहात आणला असावा. याप्रकरणाची विभागीय चौकशी करण्यात आली. - योगेश देसाई, कारागृह अधीक्षक

Web Title: Mobile phone in Yerwada's oval!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.