मुंबई पोलिसांवर जमावाचा हल्ला
By Admin | Updated: November 27, 2014 23:59 IST2014-11-27T23:31:16+5:302014-11-27T23:59:42+5:30
धोंडेवाडीतील घटना : साध्या वेशातील अधिकाऱ्यांसह चार गंभीर जखमी

मुंबई पोलिसांवर जमावाचा हल्ला
कऱ्हाड : फसवणुकीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला पकडण्यास आलेल्या मुंबईच्या पोलीस पथकाला संतप्त जमावाने बेदम मारहाण केली. कऱ्हाडनजीक धोंडेवाडीफाटा येथे गुरूवारी रात्री ही घटना घडली. मारहाणीत पोलीस अधिकाऱ्यांसह चार कर्मचारी गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस साध्या वेशातील असल्यामुळे आरोपीच्या चिथावणीस ग्रामस्थ बळी पडले.
घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-तुर्भे पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वी धोंडेवाडी (ता. कऱ्हाड) येथील विजय ऊर्फ बाळू काकडे याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. मात्र, तो फरार होता. त्याच्या शोधासाठी तुर्भे पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक आर. जे. लाहीगुडे यांच्यासह चार ते पाचजणांचे पथक गुरूवारी दुपारी कऱ्हाडला आले. बाळू काकडे धोंडेवाडीत असल्याचे त्याच्या मोबाईल लोकेशनवरून दिसून आल्याने पथक सायंकाळी धोंडेवाडी फाट्यावर पोहोचले.
उपनिरीक्षक लाहीगुडे यांनी पथकातील दोन कर्मचाऱ्यांना काकडेच्या घरी पाठवून दिले. त्याच वेळी समोरून बाळू दुचाकीवरून आल्याचे पथकाने पाहिले आणि त्याला अडविले. ‘आम्ही मुंबईचे पोलीस असून तुला फसवणुकीच्या गुन्ह्यात चौकशीसाठी ताब्यात घेण्यासाठी आलो आहे,’ असे लाहीगुडे यांनी सांगितले. त्यावेळी काकडेने ‘आपण थोडा वेळ बसून बोलूया,’ अशी विनंती केली. काकडे याच्यासह पोलीस पथक नजीकच्याच कट्ट्यावर बसले असता, काकडेने मोबाईलवरून नातेवाइकांना करून ‘मुंबईतील काहीजण मला जबरदस्तीने न्यायला आलेत,’ असे त्याने सांगितले. त्यामुळे नातेवाईकांसह पन्नास ते शंभर जणांचा जमाव गावातून धोंडेवाडी फाट्यावर आला. जमावाला पोलिसांनी परिस्थिती समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमावाने कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली.
शासकीय जीपमधून पोलिसांना उतरवले
घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी धोंडेवाडी गावात संशयितांची धरपकड सुरू केली आहे. रात्री उशिरापर्यंत सुमारे पंधरा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, फसवणुकीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी बाळू काकडे यालाही अटक करण्यात आली आहे.
पोलीस पथकाला मारहाण सुरू असताना एक शासकीय जीप त्याठिकाणी पोहोचली. उपनिरीक्षक लाहीगुडे त्वरित त्या जीपमध्ये बसले.
त्यांनी जीपमधील कर्मचाऱ्यांना आपण पोलीस असल्याचे सांगून ओळखपत्रही दाखविले. त्याचवेळी जमावाने जीपला घेराव घातला.
पोलीस पथकाला वाचविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असताना जीपमधील कर्मचाऱ्यांनी पोलिसांना खाली उतरविले.
काकडेने स्वत:चे
डोके फोडून घेतले
जमावाने केलेल्या मारहाणीत उपनिरीक्षक लाहीगुडे यांच्या कानाचा पडदा फाटला आहे, तर हवालदार फरांदे यांनाही गंभीर दुखापत झाली आहे. ज्यावेळी पोलिसांनी आरोपी विजय काकडेला पकडले त्यावेळी कारवाईपासून वाचण्यासाठी त्याने स्वत:चे डोके आपटून घेऊन गंभीर दुखापत करून घेतली. तसेच मारामारीवेळी उपनिरीक्षक लाहीगुडे यांची चेन चोरीस गेल्याची फिर्याद लाहीगुडे यांनी रात्री उशिरा कऱ्हाड तालुका पोलिसांत दिली आहे.