जमावाकडून आंदोलनकर्त्यांना मारहाण, परिसरात तणाव
By Admin | Updated: January 31, 2017 17:30 IST2017-01-31T17:30:07+5:302017-01-31T17:30:07+5:30
प्रादेशिक परिवहन विभागाच्या शुल्कवाढीच्या विरोधात रिक्षा संघटनांनी एकदिवसीय राज्यव्यापी बंदची हाक

जमावाकडून आंदोलनकर्त्यांना मारहाण, परिसरात तणाव
ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 31 - प्रादेशिक परिवहन विभागाच्या शुल्कवाढीच्या विरोधात रिक्षा संघटनांनी एकदिवसीय राज्यव्यापी बंदची हाक दिली असताना कसबा बावडा भगवा चौकात रस्त्यावर फिरणाऱ्या रिक्षाची चार-पाच आंदोलकांनी तोडफोड केली. यावेळी बावड्यातील स्थानिक पाचशे जणांच्या जमावाने आंदोलकांची धरपकड करीत बेदम मारहाण केल्याने तणाव पसरला. मंगळवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास घडलेल्या या प्रकाराने शाहूपुरी पोलिसांनी धाव घेत जमावाला पिटाळून लावले.
अधिक माहिती अशी, रिक्षा संघटनांचा मंगळवारी राज्यव्यापी बंद होता. त्यामुळे शहरात रस्त्यावर सोमवारी मध्यरात्रीपासून एकही रिक्षा फिरत नव्हती. सकल मराठा समाजाचे चक्काजाम आंदोलन सुरू असल्याने रस्त्यावर नागरिकांची वर्दळ होती. कसबा बावडा पॅव्हेलियन मैदानावर क्रिकेट स्पर्धा सुरू आहेत. या ठिकाणी कृष्णात शंकरराव काशिद (रा. कवडे गल्ली) यांचा सरबत-लस्सीचा गाडा आहे. मंगळवारी सकाळी घरातून साहित्य घेऊन ते आपल्या रिक्षातून (एमएच ०९ क्यू-९७९०) मधून मैदानाकडे निघाले होते. भगवा चौकात येताच मोटरसायकलवरून आलेल्या चार-पाच कार्यकर्त्यांनी त्यांना अडविले.
बंद पुकारला असताना तुम्ही रिक्षा बाहेर का काढली म्हणून त्यांना जाब विचारला. यावेळी काशिद यांनी मी प्रवासी वाहतूक करीत नाही. माझा सरबत-लस्सीचा व्यवसाय आहे. साहित्य घेऊन चाललोय असे सांगितले. त्यांचे बोलणे ऐकण्याच्या मनस्थितीत ते नव्हते. त्यांनी दगड घालून रिक्षाची दर्शनी काच फोडली. भर चौकात वादावादीचा प्रकार पाहून बावड्यातील पाचशे तरुणांचा जमाव चौकात आला. आंदोलकांच्यातील तिघा-चौघांनी मद्यप्राशन केल्याचे लक्षात येताच जमावाने या सर्वांची इथेच्छ धुलाई केली. या प्रकाराची माहिती समजताच पोलिसांचा फौजफाटा चौकात आला. त्यांनी सर्वांना पिटाळून लावले. यावेळी रिक्षा फोडणारे व मार खाणारे आंदोलनकर्तेही पसार झाले. त्यानंतर काशिद हे रिक्षा घेऊन मैदानावर गेले. रिक्षाची तोडफोड करणारे आंदोलनकर्ते हे शहरातील असल्याची घटनास्थळी चर्चा होती. पोलिसांनाही त्यांची नावे माहिती नव्हती.