मनसेला खिंडार, तीन माजी आमदार भाजपामध्ये
By Admin | Updated: January 13, 2015 15:13 IST2015-01-13T14:47:04+5:302015-01-13T15:13:19+5:30
मनसेचे माजी आमदार प्रवीण दरेकर, वसंत गीते आणि रमेश पाटील या तिघांनीही मंगळवारी भाजपामध्ये प्रवेश केला.

मनसेला खिंडार, तीन माजी आमदार भाजपामध्ये
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १३ - विधानसभा निवडणुकीतील निराशाजनक कामगिरीनंतर मनसेला आता गळती लागली आहे. मनसेचे माजी आमदार प्रवीण दरेकर, वसंत गीते आणि रमेश पाटील या तिघांनीही मंगळवारी भाजपामध्ये प्रवेश केला. तर मनसेचे नेते अखिलेश चौबेही मनसेला राम राम करत भाजपामध्ये दाखल झाले आहेत.
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर प्रवीण दरेकर आणि वसंत गीते या दोघांनी मनसेच्या पदांचा राजीनामा दिला होता. तर कल्याण ग्रामीणमधील माजी आमदार रमेश पाटील हेदेखील नाराज असल्याचे वृत्त होते. मनसेतील या नाराज नेत्यांची मध्यंतरी डोंबिवलीत गुप्त बैठकही पार पडली होती. या बैठकीमध्ये तिघांनी पुढील राजकीय वाटचालीवर चर्चा केल्याचे वृत्त होते.
मंगळवारी दुपारी प्रवीण दरेकर, वसंत गीते आणि रमेश पाटील या तिघांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. या तिघांनीही कोणतेही पद मागितलेले नसून ते कार्यकर्ते म्हणूनच पक्षात आले आहेत असे दानवे यांनी स्पष्ट केले. गीते यांच्या प्रवेशामुळे नाशिक महापालिकेतील सत्तेचे समीकरण बदलणार का असा प्रश्न विचारला असता राजकारणात काहीच अशक्य नाही असे सूचक उत्तरही दानवे यांनी दिले. रमेश पाटील यांच्या भाजपा प्रवेशामुळे कल्याण - डोंबिवलीत मनसेला धक्का बसू शकतो. आगामी महापालिका निवडणुकीत या तिन्ही नेत्यांमुळे भाजपाला फायदा होईल असे दिसते. दरम्यान, शिवसेनेचे माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांनीदेखील भाजपामध्ये प्रवेश केला आहे.