मुंबई महापालिका हेच मनसेचे लक्ष्य
By Admin | Updated: March 30, 2015 02:49 IST2015-03-30T02:49:55+5:302015-03-30T02:49:55+5:30
औरंगाबाद व नवी मुंबई महापालिकेतील निवडणुकीपासून दूर राहणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईच्या प्रस्तावित विकास आराखड्याच्या विरोधात

मुंबई महापालिका हेच मनसेचे लक्ष्य
मुंबई : औरंगाबाद व नवी मुंबई महापालिकेतील निवडणुकीपासून दूर राहणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईच्या प्रस्तावित विकास आराखड्याच्या विरोधात मान्यवरांचे चर्चासत्र आयोजित करून यापुढे आपले लक्ष्य केवळ मुंबई महापालिकेची निवडणूक हेच असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
मुंबई महापालिकेच्या प्रस्तावित विकास आराखड्यास भाजपाच्या व्यासपीठावर हजर राहून नरेंद्र मोदी यांच्यावर स्तूतीसुमने उधळणारे पटकथा लेखक सलीम खान यांचा तसेच मोदी यांची पंतप्रधान झाल्यावर आवर्जून भेट घेणारे आमीर खान व सलमान खान यांचा विरोध असल्याचे अधोरेखित करून या विकास आराखड्याविरोधात व्यापक विरोधी वातावरण निर्माण करणे हा राज यांचा हेतू असल्याचे बोलले जाते. या विकास आराखड्यावरून शिवसेना-भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न राज करणार आहेत.
मात्र त्याचवेळी राज यांचे टीकाकार विकास आराखड्यासारख्या क्लिष्ट व तांत्रिक विषयावर भाष्य करण्याकरिता महेश मांजरेकर यांच्यापासून सलमान खानपर्यंत आणि भरत जाधवपासून जावेद अख्तर यांच्यापर्यंत कलाकार मंडळी जमा करुन मनसेने काय साधले, असा सवाल केला जात आहे. राज यांना नेहमीच इव्हेंट सादर करण्याची आवड राहिली असून विकास अराखड्यावरील चर्चेचा हा इव्हेन्ट साजरा करुन ते गप्प बसतील, असे भाजपाच्या नेत्यांचे मत आहे. (विशेष प्रतिनिधी)