मनसे अध्यक्ष राज ठाकरे डोंबिवलीसाठी इच्छुक?

By Admin | Updated: June 2, 2014 12:45 IST2014-06-02T09:32:39+5:302014-06-02T12:45:05+5:30

मनसे अध्यक्ष राज ठाकरे विधानसभा निवडणूक डोंबिवलीतून लढविण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यादृष्टीने सर्वसामान्य नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी ते दोन दिवस डोंबिवलीत येणार असल्याची चर्चा आहे.

MNS president Raj Thackeray is interested in Dombivli? | मनसे अध्यक्ष राज ठाकरे डोंबिवलीसाठी इच्छुक?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे डोंबिवलीसाठी इच्छुक?

कार्यकर्त्यांमध्ये चर्चा : लवकरच घेणार जनमताचा कानोसा

अनिकेत घमंडी, डोंबिवली

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे वक्तव्य शनिवारच्या मुंबईतील सभेत केले. आणि त्यानंतर ते नेमके कुठून उभे राहणार, या कार्यकर्त्यांमध्ये सुरू असलेल्या चर्चेत मुंबई-ठाण्यातील कार्यकर्त्यांनी ते डोंबिवलीतून निवडणूक लढविण्याची शक्यता वर्तवली. डोंबिवलीतील पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी मात्र सावध पवित्रा घेत याबाबत ठाम भाष्य करणे टाळून ‘असू शकते’ एवढीच प्रतिक्रिया देत नकळतपणे त्यास दुजोरा दिला. त्यादृष्टीने डोंबिवलीतील दिग्गज, प्रतिष्ठित यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांची मते, त्यांच्या समस्या, तक्रारी, पक्षांतर्गत कुरबुरी जाणून घेण्यासाठी ते लवकरच दोन दिवस येथे तळ ठोकणार असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले. तेव्हाच कल्याण-डोंबिवली महापालिकेतील त्यांच्या तब्बल २८ नगरसेवकांचे प्रगतीपुस्तकही ते तपासतील का, या दडपणामुळे नगरसेवकांचे धाबे दणाणले आहेत. येथे आल्यावर त्यांच्याशीही चर्चा करून येथील मतदारांचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न ते करतील. आगामी आठवडा-पंधरवड्यात ते येथे येणार असल्याच्या वृत्तालाही दुजोरा देण्यात आला. डोंबिवलीकरांनीही गेल्या महापालिका निवडणुकीत आणि कल्याण पश्चिम आणि ग्रामीणच्या विधानसभा निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांना कौल दिला होता. त्यामुळेच या ठिकाणी एक प्रमुख घटक पक्ष अशी त्यांची ख्याती झाली. महापालिकेत मिळालेल्या सर्वाधिक जागांमध्ये डोंबिवलीतून जास्ती नगरसेवक त्यांचे निवडून आले. गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत त्यांना विरोधकाच्या बाकड्यावर बसून फारसे काहीही साध्य करता आले नसले तरीही मतदारांचे प्रेम असल्याची भावना त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अद्याप आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीत त्यांच्या उमेदवाराने सपाटून मार खाल्ला असला तरीही डोंबिवलीसह ग्रामीणच्या विधानसभा मतदारसंघातून त्यांना अनुक्रमे ३१,४८४ आणि २६,५३९ मते मिळाल्याने येथे विधानसभा निवडणुकीत चुरस होऊ शकते, अशी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे. डोंबिवली विधानसभेत सुमारे साडेतीन लाख मतदार असून, लोकसभा निवडणुकीत एकूण १,४७,११७ एवढे मतदान झाले होते. त्यापैकी त्यापैकी शिवसेनेला (महायुतीला) ९०,३५९, मनसे २६,५३९, तर राष्ट्रवादी काँग्रेस १८,१७४ एवढी मते पडली असून अन्य मते ही विभिन्न पक्ष-अपक्ष उमेदवारांना पडली आहेत. या सार्‍याचा विचार करता गेल्या महापालिका अथवा विधानसभा निवडणुकीचा ट्रेंड हा वेगळा होता आणि सध्याची मतदारांची मानसिकता ही ‘नमो’ची असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यातही डोंबिवली आणि कल्याण हा पूर्वीचा जनसंघाचा आणि सध्याचा भाजपाचा गड असून, तो काबीज करणे मुश्कील असल्याचे काही वर्षांच्या निवडणुकांमधून स्पष्ट होत आहे. परिवर्तन आणि तरुणांची मानसिकता याचा जरी विचार केला तरीही मनसेला येथून विधानसभा त्यांच्या पारड्यात पाडून घेणे कठीण आहे. वास्तविक पाहता एकूण मतदानापैकी अवघे ४१ टक्केच मतदान लोकसभेत झाले होते. मतदारांचा प्रचंड उत्साह असल्याने सकाळच्या वेळेत आणि संध्याकाळी ५-६ या वेळेत झालेले मतदान असून, त्यातील बहुतांशी मतदारांनी महायुती-भाजपाला कौल दिला आहे. त्यातच ज्यांना चढत्या पार्‍यामुळे येता आले नाही ते मतदार विधानसभेची संधी सोडणार नाहीत. त्यामुळे डोंबिवलीची भाजपाची सीट ही विक्रमी मतांनी विजयी होईल, असा विश्वास महायुतीला आहे. त्यामुळे मनसेला येथे विजयश्री मिळवण्यासाठी संघ स्वयंसेवकांसह पांढरपेशा समाज, सध्याच्या आमदारांना असलेला जनाधार, त्यांचा थेट जनसंपर्क या सर्व आव्हानांना तोंड देत पक्षांतर्गत असलेली फूट व गळतीवर अंकुश ठेवावा लागेल. या सर्वांबरोबर कार्यकर्त्यांची भक्कम फळी तयार करावी लागणार असल्याचे मत पदाधिकार्‍यांनी व्यक्त केले.

विशेष ओढ असल्याची चर्चा

कडोंमपात मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर राज ठाकरे हे दिवाळी पहाटनिमित्त येथे आले होते. विधानसभा निवडणुकीवेळीही त्यांनी येथीलच एका संकुलात तळ ठोकला होता. त्यावरून त्यांना डोंबिवलीबाबत विशेष ओढ असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे.

Web Title: MNS president Raj Thackeray is interested in Dombivli?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.