एआयबीच्या तन्मय भट्ट विरोधात मनसेची पोलिस तक्रार

By Admin | Updated: May 30, 2016 11:52 IST2016-05-30T08:48:16+5:302016-05-30T11:52:25+5:30

तन्मय भट्ट महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह विनोदामुळे वादाच्या भोव-यात सापडला आहे.

MNS police complaint against AIB's Tanmay Bhatt | एआयबीच्या तन्मय भट्ट विरोधात मनसेची पोलिस तक्रार

एआयबीच्या तन्मय भट्ट विरोधात मनसेची पोलिस तक्रार

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ३० - एआयबी कॉमेडियन तन्मय भट्ट महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह विनोदामुळे वादाच्या भोव-यात सापडला आहे. तन्मयने सचिन आणि लतादीदींबद्दल विनोदाच्या नावाखाली अंत्यत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने सोशल मिडीयावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
विराट कोहली हा सचिनपेक्षा दसपटीने महान क्रिकेटर असल्याच्या विनोद कांबळीच्या कथित वक्तव्याचा धागा पकडत हा व्हिडीओ बनविण्यात आला आहे. यात सचिन आणि लता मंगेशकर यांच्यादरम्यान काल्पनिक संवाद दाखविण्यात आला आहे. ‘सिव्हिल वॉर’ या नावाखाली हा व्हिडीओ फेसबुकवर अपलोड करण्यात असून त्यामध्ये विनोदाच्या नावाखाली अत्यंत खालची पातळी गाठण्यात आली आहे. त्यामुळे बॉलिवूडमधल्या सेलिब्रेटींसह अनेक नेटीझन्सनी या व्हिडीओबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे.
प्रख्यात अभिनेते अनुपम खेर यांनी हा व्हिडिओ संतापजनक असल्याची प्रतिक्रिया टि¦टरवरून दिली आहे. मला नऊ वेळा उत्कृष्ट विनोदी अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. विनोद आम्हालाही समजतो. हा व्हिडीओ विनोद नाही. हा व्हिडीओ घाणोरडा आणि अपमानकारक असल्याचे खेर यांनी ट्विट केले आहे.  
 

सचिन आणि लता मंगेशकर दोघांनाही भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मनसेने तन्मयला तू रस्त्यावर उतरुन दाखवं असा इशारा देताना त्याच्याविरोधात पोलिस तक्रारही केली आहे.
अभिनेता रितेश देशमुखनेही हा व्हिडीओ पाहून धक्का बसल्याचे ट्विट केले. अपमान विनोद असू शकत नसल्याचे रितेश देशमुखने तन्मय भट्टला सुनावले. अभिनेत्री सेलिना जेटली हिने या व्हिडीओबद्दल तन्मय भट्टने तत्काळ लतादीदींची माफी मागावी, अशी मागणी केली आहे. 
 

Web Title: MNS police complaint against AIB's Tanmay Bhatt