- मयुर तांबडे
नवीन पनवेल : शेतकरी कामगार पक्षाच्या 78 व्या वर्धापन दिन सोहळ्यात पनवेलमध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आले होते. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या रायगड जिल्ह्यात असलेल्या अनधिकृत डान्सबारवर टीका केली होती. या ठिकाणी बार बंद असावेत, अशी अपेक्षा करण्यात आली. त्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पनवेल तालुक्यातील कोन जवळ असलेल्या नाईट रायडरया लेडीज सर्विस बारवर धडक दिली. मध्यरात्री बारा वाजता मनसैनिकांनी हा बार फोडला.
पनवेलमधील मुंबई पुणे दृतगती मार्गाच्या काही अंतरावर असलेल्या हा बार रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे या कारवाईमुळे उघड झाले आहे. हातामध्ये काठ्या आणि दांडके घेऊन मनसेच्या कार्यकर्त्यांनी हा बार फोडला. राज ठाकरे यांच्या डान्स बारविरोधी वक्तव्यानंतर शनिवारी रात्री मनसे कार्यकर्त्यांनी पनवेलमधील 'नाईट रायडर्स' बारवर हल्ला केला आहे.
राज ठाकरे काय म्हणालेले...
आज सर्वाधिक डान्सबार रायगड जिल्ह्यात कसे?, रायगड जिल्हा ही शिवछत्रपतींची राजधानी आहे. कल्याणच्या सूभेदाराची सून खणानारळाने ओटी भरणाऱ्या आपल्या राजा शिवछत्रपतींची राजधानी इथे आहे तिथे डान्सबार सुरू आहे. महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य संमेलन भरवतंय, हे नुसते गुजराती माणसाबद्दल प्रेम नाही. त्यातून मराठी माणूस आणि गुजराती माणसांमध्ये भांडण लावावी यासाठी केलेले हे उद्योग आहे. तुम्हाला हवे ते आम्ही करणार नाही परंतु ज्यावेळी समजेल तुमच्या कृतीतून महाराष्ट्राला नख लागतंय त्यावेळी अंगावर येऊ. कान बंद ठेवू नका, डोळे बंद ठेवू नका. आपल्या आजूबाजूला काय सुरू आहे त्यावर बारीक लक्ष ठेवले पाहिजे. तुम्ही विकले जातायेत, पायाखालची जमीन निसटतेय. भाषा जातेय मग कालांतराने डोक्यावर पश्चातापाचा हात मारावा लागेल. तुमच्या प्रत्येकाकडे पैसे आले पाहिजे. कुटुंब उभी राहिली पाहिजे पण महाराष्ट्र विकून नाही असंही राज ठाकरे यांनी सांगितले.