Pahalgam Terror Attack: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात अनेक कठोर निर्णय घेतले. पाकिस्तानी नागरिकांनी भारतातून ४८ तासांत मायदेशी निघून जावे, असा आदेश देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना थेट फोन करून एकही पाकिस्तानी नागरिक भारतात राहू नये, याची खातरजमा करण्यास सांगितले. एकीकडून भारत पाकिस्तानविरोधात कठोर निर्णय घेतले जात असून, दुसरीकडे देशभरात या हल्ल्यानंतर तीव्र संताप असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच शरद पवार यांनी केलेल्या विधानावर मनसे नेत्यांनी पलटवार केला आहे.
इंटेलिजन्स फेल्युअर आहे हे सरळ दिसत आहे. पहलगाम हे त्यातल्या त्यात अधिक सुरक्षित आहे. दोन-तीन महिन्यापूर्वीच मी तिथे जाऊन आलो. सातत्याने आपले लोक तिथे जातात. दहशतवाद्यांनी आपले उद्दिष्ट साध्य केले, हा जो निष्कर्ष काढला जातो, तो अधिक सावधान करणारा आहे. पर्यटकांना हिंदू आहेत म्हणून गोळ्या घातल्या यामध्ये काय सत्य आहे? याबाबत मला माहिती नाही. पण तिथे जी लोक होती, त्यातील स्त्रियांना सोडले असे दिसते आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. याला आता मनसे नेते प्रकाश महाजन यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा?
प्रकाश महाजन म्हणाले की, शरद पवारांचे वक्तव्य दुर्दैवी आणि राजकीय सोयीचे आहे. शरद पवार नेहमी अशी भूमिका घेतात. पीडित कुटुंबाला भेटायला गेलेल्या शरद पवारांना महिलांनी सांगितले की, टिकल्या काढल्या म्हणून आम्ही वाचलो. अजून शरद पवारांना काय पुरावा पाहिजे? त्यांना नेमकी कुठली भीती वाटते? हिंदू म्हणून त्यांनी मारले, हे कटू सत्य शरद पवार का नाकारतात? हिंदू म्हणून मारले हे का मान्य करत नाही? असे एकामागून एक प्रश्न प्रकाश महाजन यांनी उपस्थित केले.
दरम्यान, सरकारच्या गुप्तचर विभागाचे हे अपयश आहे. परंतु, स्थानिक लोक मदत करतात हेही सत्य आहे. प्रत्यक्ष मृत्यू दिसत असताना त्यांनी आपला धर्म नाकारला नाही. ज्यांच्या वडिलांनी आयुष्यभर हिंदुत्वाचा पुरस्कार केला, त्या उद्धव ठाकरेंचा एकही खासदार दिल्लीतील सर्वपक्षीय बैठकीला नव्हता. तरीही तुम्ही स्वतःला हिंदूंचे कैवारी म्हणता, अशी टीका प्रकाश महाजन यांनी ठाकरे गटावर केली.