महिलेला अश्लील मेसेज पाठवणा-या मनसे नगरसेवकाला अटक
By Admin | Updated: February 9, 2017 15:50 IST2017-02-09T15:47:16+5:302017-02-09T15:50:00+5:30
दादरमधील मनसेचे नगरसेवक सुधीर जाधव यांना महिलेला अश्लील मेसेज पाठवल्याच्या प्रकरणात अटक झाली आहे.

महिलेला अश्लील मेसेज पाठवणा-या मनसे नगरसेवकाला अटक
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 9 - दादरमधील मनसेचे नगरसेवक सुधीर जाधव यांना महिलेला अश्लील मेसेज पाठवल्याच्या प्रकरणात अटक झाली आहे. महिलेच्या तक्रारीवरुन दादर पोलिसांनी सुधीर जाधव यांना गुरुवारी दुपारी अटक केली. सुधीर जाधव यांच्या पत्नी स्नेहल जाधव या वॉर्ड क्रमांक 192 मधून मनसेच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत.
पत्नीचा निवडणूक प्रचार करताना सुधीर जाधव तक्रारदार महिलेच्या घरी गेले होते. रात्रीच्यावेळी सुधीर जाधव यांनी महिलेला अश्लील मेसेजेस पाठवले. त्यांनी महिलेकडे तिचा फोटो पाठवण्याचा आग्रह धरला होता असा आरोप महिलेने केला.
संबंधित महिलेची समाजसेविका म्हणून ओळख आहे. महिलेच्या तक्रारीवरुन जाधव यांच्या विरोधात दादर पोलिस स्थानकात कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. आधीच पक्ष अनेक अडचणींचा सामना करत आहे. त्यात दादरमधील शिवसेनेविरोधातील लढाई मनसेसाठी प्रतिष्ठेची असताना सुधीर जाधव यांच्या कृत्यामुळे पक्ष अडचणीत आला आहे.