मनसेअध्यक्षांची राजकीय ताकद हा संशोधनाचा विषय - उद्धव ठाकरे
By Admin | Updated: October 7, 2014 09:30 IST2014-10-07T09:23:21+5:302014-10-07T09:30:16+5:30
भाजपविरोधासाठी उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र येतील अशी चर्चा रंगली असतानाच मनसेअध्यक्षांची राजकीय ताकद किती हा संशोधनाचाच विषय आहे असा चिमटा उद्धव ठाकरे यांनी मनसेला काढला आहे.
मनसेअध्यक्षांची राजकीय ताकद हा संशोधनाचा विषय - उद्धव ठाकरे
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ७ - भाजपविरोधासाठी उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र येतील अशी चर्चा रंगली असतानाच मनसेअध्यक्षांची राजकीय ताकद किती हा संशोधनाचाच विषय आहे असा चिमटा उद्धव ठाकरे यांनी मनसेला काढला आहे. तर नरेंद्र मोदी हे भाजपचे टोलेजंग नेतृत्व आहे. मात्र त्यांनी असे गावोगावी फिरणे त्यांच्या इभ्रतीस शोभणारे नसून पंतप्रधानपदाचा आब राखलाच पाहिजे असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्र दौ-यावर टीका करताना उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवरही निशाणा साधला. पंतप्रधान होऊनही मोदी गुजरातमध्येच अडकले आहेत, महाराष्ट्रातील गोष्टी गुजरातला घेऊन जाण्यासाठी त्यांना राज्यात सत्ता हवी का असा त्रागा मनसेअध्यक्षांनी केला आहे. शिवसेनेने यापूर्वीच ही भूमिका मांडली असून इतरांना आत्ताच कंठ फुटला आहे असा टोला उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांना उद्देशून लगावला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी उद्धव ठाकरे म्हणतात, मोदी हे भाजपचे सुपरस्टार प्रचारक असल्याने ते दिल्लीतील कारभार सोडून राज्यात सभा घेत आहेत. मात्र असे गावोगावी फिरणे त्यांच्या इभ्रतीस शोभणार नसून पंतप्रधानपदाचा आब राखलाच पाहिजे. मोदींच्या सभेसाठी सुरक्षा व्यवस्था व अन्य तामझामावर अनावश्यक खर्च होतो व हा भार जनतेच्या तिजोरीवरच पडतो. सोनिया गांधी, मनमोहन सिंग यांच्यावरही याच कारणावरुन टीका झाली होती अशी आठवणही त्यांनी करुन दिली. पंतप्रधान झाल्यावर मोदींनी महाराष्ट्रासाठी काय केले असा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडला आहे असे उद्धव ठाकरेंनी नमूद केले.