मनसे- भाजपाचा मधुचंद्र संपुष्टात
By Admin | Updated: July 1, 2014 01:54 IST2014-07-01T01:54:11+5:302014-07-01T01:54:11+5:30
दोन वर्षापूर्वी महापालिकेच्या निवडणुकीत मनसे आणि भाजपाने एकत्र येऊन केलेला अभिनव युतीचा प्रयोग सोमवारी स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडीवरून संपुष्टात आला.

मनसे- भाजपाचा मधुचंद्र संपुष्टात
>नाशिक : दोन वर्षापूर्वी महापालिकेच्या निवडणुकीत मनसे आणि भाजपाने एकत्र येऊन केलेला अभिनव युतीचा प्रयोग सोमवारी स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडीवरून संपुष्टात आला.
महापालिकेची तिजोरी आपल्याच हाती ठेवण्यासाठी मनसे आणि भाजपात झालेल्या रस्सीखेचीनंतर दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले. तथापि, अपक्षाच्या मदतीने मनसेचे राहुल ढिकले अवघ्या एकमताने सभापतिपदी आरूढ झाले आणि शिवसेनेचे साथ घेऊनही भाजपाच्या रंजना भानसी यांच्यावर पराभवाची नामुश्की ओढावली.
सभापतिपदासाठी यंदा भाजपाने दावा सांगितला होता. परंतु मनसे हे पद सोडण्यास तयार नव्हते. त्यातच गेल्या वेळी मनसेला साथ देणा:या शिवसेनेनेदेखील सभापतिपदावर दावा सांगितला होता. अखेर भाजपा आणि मनसेच्या रस्सीखेचीत सेनेने माघार घेतली आणि भाजपाला पाठिंबा दिला. कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीने या निवडणुकीच्या घोडेबाजारात न पडता सभात्याग करण्याचा निर्णय घेतला. मनसेचे पाच आणि एक अपक्ष अशा सहा जणांनी ढिकले यांना मतदान केले, तर भाजपाच्या दोन आणि सेनेच्या तीन अशा पाच जणांनी भानसी यांना मते दिली. राष्ट्रवादीच्या तीन आणि कॉँग्रेसच्या दोन अशा पाच सदस्यांनी सभात्याग केला. महापालिकेत मनसे आणि भाजपा वेगळे झाल्याने आगामी विधानसभा निवडणुकीची ही नांदी मानली जात आहे. (प्रतिनिधी)
इतर कोणत्याही पक्षाची मदत न घेता अपक्षांच्या मदतीने मनसेचा सभापती होऊ शकला आहे. पक्षाचे विधिमंडळ नेते बाळा नांदगावकर यांनी राज्यातील घडामोडी बघून निर्णय घेतला होता आणि त्यानुसार मनसेने भूमिका घेतली.
- अॅड. यतिन वाघ, महापौर