अतिक्रमणाविरोधात मनपाची धडक मोहीम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2016 03:03 IST2016-10-20T03:03:43+5:302016-10-20T03:03:43+5:30

पावसाळा संपल्यामुळे महापालिकेची अतिक्रमणविरोधी मोहीम पुन्हा सुरू झाली

MMP's campaign against encroachment continues | अतिक्रमणाविरोधात मनपाची धडक मोहीम सुरू

अतिक्रमणाविरोधात मनपाची धडक मोहीम सुरू


नवी मुंबई : पावसाळा संपल्यामुळे महापालिकेची अतिक्रमणविरोधी मोहीम पुन्हा सुरू झाली आहे. बेलापूर, तुर्भे, ऐरोलीसह कोपरखैरणे परिसरात एकाच वेळी धडक मोहिमा सुरू झाल्या असून अतिक्रमण करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर फेरीवाले, मार्जिनल स्पेस व इतर अतिक्रमण विरोधात जोरदार मोहीम राबविली होती. पावसाळ्यामुळे अतिक्रमण विरोधी मोहीम थांबविली होती. पावसाळा संपताच कारवाई पुन्हा सुरू झाली आहे. अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण, उपआयुक्त कैलास गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दोन सत्रांमध्ये कारवाई सुरू केली आहे.
>दोन डंपर जप्त
डेब्रिजविरोधी पथकानेही शहरात कारवाई सुरू केली आहे. गोठविली व घणसोलीमध्ये पामबीच मार्गाजवळ मँग्रोजवर डेब्रिज टाकणाऱ्या दोन डंपरवर कारवाई केली आहे. शहरवासीयांना अतिक्रमणमुक्त पदपथ उपलब्ध व्हावे यासाठी नियमितपणे कारवाई केली जाणार आहे.
>बेलापूरमध्ये फेरीवाल्यांना हटविले
बेलापूरचे विभाग अधिकारी सुभाष अडागळे यांनी सेक्टर ४ व २३ मध्ये कारवाई करून १५३ फेरीवाल्यांना हटविले आहे. फेरीवाल्यांचे साहित्य जप्त केले आहे. सुनील गावस्कर मैदानासमोर उभारण्यात येणाऱ्या दोन मोबाइल टॉवरवरही कारवाई केली. दोन मजली इमारतीवर कारवाई
ऐरोलीमध्ये गीता मिश्रा यांनी दोन मजली अनधिकृत इमारत उभारली होती. सहायक आयुक्त चंद्रकांत तायडे यांच्या पथकाने या इमारतीवर कारवाई केली आहे. सेक्टर १५ मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन नजीकच्या अनधिकृत नर्सरीवरही
कारवाई केली आहे, याशिवाय सेक्टर १ मधील अनधिकृत मोबाइल टॉवर हटविण्यात आला. ६३ झोपड्यांवर कारवाई
तुर्भे विभाग अधिकारी अंगाई साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली मलनि:सारण केंद्राबाहेरील झोपड्यावर असलेल्या ६३ झोपड्या हटविण्यात आल्या आहेत. याशिवाय सेक्टर १९ मधील व्यापाऱ्यांनी मार्जिनल स्पेसमध्ये केलेले अतिक्रमणही काढण्यात आले आहे.

Web Title: MMP's campaign against encroachment continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.