Rohit Patil Meet Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. शरद पवार गटाच्या आमदारांच्या अजित पवार यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण येत आहेत. मात्र मतदारसंघातील कामाच्या निमित्ताने या भेटी होत असल्याचे शरद पवार गटाच्या आमदारांनी म्हटलं. त्यानंतर आता पहिल्यांदाच आमदार झालेल्या रोहित पाटील यांनी अजित पवार यांची भेट घेतली आहे. रोहित पाटील यांनी या भेटीचे फोटो पोस्ट करत कारण सांगितलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून शरद पवार गटाच्या आमदारांच्या अजित पवार यांच्यासोबत गाठीभेटी वाढल्याचे पाहायला मिळत आहेत. त्यामुळे शरद पवार गटाचे आमदार शरद पवार यांची साथ सोडणार का किंवा दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येणार का असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तसेच विरोधी पक्षाच्या आमदारांकडून सत्ताधाऱ्यांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही म्हटलं जात आहे. अशातच तासगाव कवठेमहांकाळचे आमदार रोहित पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याचे समोर आलं आहे. मतदरसंघातील कामांबाबत मागणी करण्यासाठी अजित पवार यांची भेट घेतल्याचे रोहित पाटील यांनी म्हटलं.
"आज राज्याचे अर्थमंत्री अजित दादा पवार यांची भेट घेत सांगली जिल्ह्यातील सामान्य घरातील मुलांना ज्या हॉस्टेलने आसरा देण्याचे काम केले त्या महात्मा गांधी वसतिगृहाची माहिती देत निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. दादांनी तत्परतेने ग्रामविकास खात्याने प्रधान सचिव यांच्याशी संपर्क साधत निधी देण्याबाबत सूचना केली व त्याचबरोबर अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विशेष तरतूद करण्याचे आश्वासन देखील दिले. त्याचबरोबर मतदरसंघातील कामांबाबत मागणी केली," असं आमदार रोहित पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, यापूर्वी वडगाव शेरीचे आमदार बापू पठारे आणि बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी अजित पवार यांची भेट घेतली होती. बापू पठारे यांनी मतदारसंघातील विविध कामांसंदर्भात भेट घेतल्याचे सांगितले होते. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा नाही, असा दावा त्यांनी केला होता. तर संदीप क्षीरसागर यांनी बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी निवड झाल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन अभिनंदन केले असं म्हटलं होतं.