शिंदे गटाचे आ. संजय गायकवाड यांनी भर मिरवणुकीत युवकाला बेदम झोडपले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2024 06:17 AM2024-03-02T06:17:58+5:302024-03-02T06:18:23+5:30

व्हिडीओ व्हायरल : कार्यकर्त्याने अडवले म्हणून बचावला तरुण; वाघाची शिकार केल्याप्रकरणी झाला होता वन खात्यात गुन्हा 

MLA of the Shinde group Shivsena Sanjay Gaikwad beat the youth in the procession, Video Viral | शिंदे गटाचे आ. संजय गायकवाड यांनी भर मिरवणुकीत युवकाला बेदम झोडपले

शिंदे गटाचे आ. संजय गायकवाड यांनी भर मिरवणुकीत युवकाला बेदम झोडपले

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलढाणा : शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी १९ फेब्रुवारीला शिवजयंतीच्या मिरवणुकीत पोलिसांच्या काठीने एका युवकास बेदम झोडपल्याचा व्हिडीओ शुक्रवारी समाजमाध्यमावर व्हायरल झाला. त्यामुळे आमदाराच्या दादागिरीबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.

आमदार गायकवाड हे काही दिवसांपासून वादात आहेत. याच आठवड्यात शिकार केलेल्या वाघाचा दात गळ्यात घालण्यासाेबतच एका महिलेची शेती हडप केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. असे असतानाच आता एका तरुणाला बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने पुन्हा त्यांच्या दादागिरीचा प्रकार समोर आला आहे. 

पोलिसाची काठी घेऊन दादागिरी
संबंधित व्हिडीओ हा १९ फेब्रुवारीच्या शिवजयंती मिरवणुकीचा आहे. यामध्ये एका युवकास पोलिसांनी धरलेले असताना आमदार गायकवाड हे पोलिसाच्या हातातील काठी हिसकावून स्वत:च त्या युवकास बेदम मारहाण करीत आहेत. पोलिस त्यांचे कर्तव्य निभावत असताना लोकप्रतिनिधीने कायदा हातात घेऊन अशा प्रकारची दादागिरी केल्याबद्दल नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

पोलिसांत तक्रार नाही
१९ फेब्रुवारीच्या या प्रकाराबद्दल पोलिसांमध्ये कुठलीही तक्रार दाखल झालेली नाही. मात्र या व्हायरल व्हिडीओनंतर कारवाई हाेणार का? असा प्रश्न विराेधी पक्षाने विचारला आहे.

तक्रार आल्यास कारवाई 
पोलिसांकडे अद्याप कुठलीही तक्रार आलेली नाही. मात्र तक्रार आल्यास संपूर्ण शहानिशा व कायदेशीर बाबींची तपासणी करून निश्चितच गुन्हा दाखल करण्यात येईल.
- सुनील कडासने, पोलिस अधीक्षक, बुलढाणा

आमदार गायकवाड सातत्याने वादात
nशिवजयंतीच्या कार्यक्रमातच आ. गायकवाड यांनी ३७ वर्षांपूूर्वी वाघाची शिकार केली असून त्याचा दात गळ्यातील माळेमध्ये घातल्याचे वक्तव्य केले होते. स्थानिक माध्यमांशी वेशभूषेसंदर्भात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले होते. 
nया प्रकरणात वनविभागाच्या एका पथकाने त्यांचा जबाबही नोंदविला होता. सोबतच तो कथित दातही ताब्यात घेतला होता. सोमवारी हा दात डेहराडून येथील वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूटकडे डीएनए तपासणीसाठी पाठविल्याचे वन विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
nहे प्रकरण शांत होते न होते तोच नागपूर येथील रिता उपाध्याय या महिलेची जमीन आ. गायकवाड यांनी हडप केल्याचे प्रकरण समोर आले होते. यामध्ये बोराखेडी पोलिसांनी २८ फेब्रुवारीला मोताळा न्यायालयाच्या आदेशानुसार आ. गायकवाड यांच्यासह पाच जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

किती बाेलायचं? : वडेट्टीवार 
nविधानसभेचे विराेधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आ.गायकवाड हे मारहाण करीत असल्याच्या व्हायरल व्हिडीओबाबत उद्वेग व्यक्त करणारी पाेस्ट एक्सवर केली आहे. 
nते म्हणतात, किती बोलायचं?, किती प्रकरणं रोज दाखवायची? या व्हिडीओत तरुणाला अमानुष मारहाण करणारी व्यक्ती ही काही मामुली गुंड नाही. मारहाण करणारी व्यक्ती मुख्यमंत्र्यांच्या गटाची आमदार आहे. 
nहवेत गोळीबार, एकमेकांवर गोळीबार, एकमेकांना लाथाबुक्क्या मारून सुरू असलेलं महायुतीचं विकासाचं राजकारण आता जनतेला लाठ्या काठ्यांनी झोडपून काढण्यापर्यंत पोहाेचलं आहे.

मारहाणीच्या घटनेचा व्हिडीओ मी बघितलेला नाही. बघितल्यानंतर पुढे काय कार्यवाही करायची ते ठरवू.     
- भरत गाेगावले, 
    प्रवक्ता, शिंदे गट

Web Title: MLA of the Shinde group Shivsena Sanjay Gaikwad beat the youth in the procession, Video Viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.