मोबाईलच्या वादातून मित्राची हत्या

By Admin | Updated: March 31, 2015 14:11 IST2015-03-31T02:05:38+5:302015-03-31T14:11:19+5:30

फुटलेल्या मोबाईल स्क्रीनने दोन मित्रांमध्ये असा काही वाद वाढवला की एकाने दुसऱ्याची गळा कापून हत्या केली.

Mitra murdered by mobile phone dispute | मोबाईलच्या वादातून मित्राची हत्या

मोबाईलच्या वादातून मित्राची हत्या

नागपूर : फुटलेल्या मोबाईल स्क्रीनने दोन मित्रांमध्ये असा काही वाद वाढवला की एकाने दुसऱ्याची गळा कापून हत्या केली. सोमवारी सकाळी आरोपी पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर ही खळबळजनक घटना उघडकीस आली. धीरज लखन राणा (वय २५) असे मृताचे नाव असून, तो प्रियदर्शिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात द्वितीय वर्षाला शिकत होता.

मूळचा मुंबई (शिवशक्ती मित्र मंडळ, ए वन बेकरी-३, डोंगरी गोरेगाव वेस्ट) येथील रहिवासी असलेला धीरज जलविहार कॉलनीत राहुल नामक मित्रासोबत भाड्याने राहात होता. तेथेच आरोपी अभिषेककुमार देवेंद्र प्रसाद (१९, रा. बरोद, जि. बलिया, उत्तर प्रदेश) राहुलच्या ओळखीने काही दिवसांपूर्वी राहायला आला. अभिषेक एमआयडीसीतील पेस वूड कंपनीत रोजंदारीवर काम करायचा. रविवारी मोबाईल चार्जिंगला लावत असताना अभिषेकचा धक्का लागल्याने धीरजचा मोबाईल खाली पडला. मोबाईलचा स्क्रीन फुटल्यामुळे धीरज संतप्त झाला. त्याने मोबाईल दुरुस्त करून देण्यासाठी अभिषेकच्या मागे तगादा लावला. कंपनीतून कामाचे पैसे मिळाल्यानंतर पैसे देईल, असे अभिषेकने सांगितले. धीरज थांबायला तयार नव्हता.
त्यामुळे त्याला घेऊन अभिषेक रविवारी रात्री १०.१५ च्या सुमारास पेस वूड कंपनीजवळ आला. कंपनीचे गेट बंद असल्यामुळे त्यांच्यात गेटसमोरच वाद झाला. ते वाद घालतच रस्त्याने निघाले. दोघेही ईरेला पेटले. त्यामुळे त्यांच्यात हाणामारी झाली. अभिषेकने भाजी कापण्याचा चाकू सोबत आणला होता. धीरज मारहाण करीत असल्यामुळे त्याने धीरजच्या गळ्यावर चाकूने वार केले. तो खाली कोसळताच त्याचा मृतदेह आॅर्डनन्स फॅक्टरीजवळच्या नाल्यात फेकून रूमवर निघून आला.
मध्यरात्री तो एकटाच आला आणि त्याची अवस्थाही चांगली नव्हती, त्यामुळे राहुलने त्याला काय झाले, धीरज कुठे आहे, अशी विचारणा केली. अभिषेकने त्याला झालेला प्रकार सांगितला. त्यामुळे राहुलने त्याला पोलिसांकडे आत्मसमर्पण करण्याचा सल्ला दिला.
एवढेच नव्हे तर त्याला सोमवारी सकाळी ८.१५ च्या सुमारास प्रतापनगर पोलीस ठाण्याजवळ नेऊन सोडले. (प्रतिनिधी)

पोलिसांची धावपळ
आरोपीने प्रतापनगर ठाण्यात पोहोचून हत्या केल्याचे सांगताच पोलिसांची धावपळ उडाली. त्याने सांगितलेले घटनास्थळ एमआयडीसीत असल्याचा अंदाज बांधून प्रतापनगर पोलिसांनी एमआयडीसी ठाण्याला माहिती दिली. शोधाशोध केल्यानंतर धीरजचा मृतदेह जेथे आढळला तो नाला वाडी पोलिसांच्या हद्दीत येत असल्यामुळे वाडी पोलिसांना कळविण्यात आले. धीरजचा मृतदेह रुग्णालयात पाठविल्यानंतर पोलिसांनी आरोपी अभिषेकला अटक केली. या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम, उपनिरीक्षक महादेव पडधान करीत आहेत.

आई-वडिलांच्या स्वप्नाला तडे
धीरजची कौटुंबिक स्थिती सर्वसाधारण आहे. त्याचे वडील मुंबईत एका कंपनीत काम करतात. एकुलता एक मुलगा हुशार असल्यामुळे त्यांनी पदरमोड करीत त्याला शिक्षणासाठी नागपुरात पाठविले. तो इंजिनीअर बनेल, त्याला नोकरी मिळाल्यानंतर सुखाचे दिवस येतील, असे स्वप्न धीरजचे आई-वडील रंगवीत होते. मात्र मोबाईलचे कारण झाले आणि धीरजचा जीव गेला.

Web Title: Mitra murdered by mobile phone dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.