मिशन महापौर
By Admin | Updated: August 29, 2014 01:06 IST2014-08-29T01:06:01+5:302014-08-29T01:06:01+5:30
महापालिकेच्या सचिव कार्यालयाने महापौर-उपमहापौर निवडीची अधिसूचना जारी केली आहे. ५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता राजे रघोजी भोसले, नगरभवनात आयोजित विशेष सभेत महापौर- उपमहापौरांची

मिशन महापौर
१ सप्टेंबरला भरा अर्ज, ५ रोजी निवडणूक : प्रवीण दटकेंना संधी
नागपूर : महापालिकेच्या सचिव कार्यालयाने महापौर-उपमहापौर निवडीची अधिसूचना जारी केली आहे. ५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता राजे रघोजी भोसले, नगरभवनात आयोजित विशेष सभेत महापौर- उपमहापौरांची निवड केली जाईल. या दोन्ही पदांसाठी इच्छुक उमेदवारांना १ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत सचिव कार्यालयात अर्ज दाखल करायचे आहेत.
महापौरपद नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी (सर्वसाधारण) राखीव असून, महापालिकेचे सत्तापक्ष नेते प्रवीण दटके यांच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडणे निश्चित मानले जात आहे. तर लोकसभा निवडणुकीत अपक्ष नगरसेवकांनी बजावलेली भूमिका पाहता यावेळी उपमहापौरपद अपक्षांना देण्याची तयारी भाजपने चालविली असून, यात अपक्षांचे गटनेते मुन्ना पोकुलवार यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेला उपमहापौरपदासाठी पुन्हा वेटिंगवर राहावे लागण्याची चिन्हे आहेत.
प्रवीण दटके हे मध्य नागपुरातून विधानसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. त्यांनी पक्षाकडे तशी मागणीही केली आहे. महापौरपद नको, मध्यचे तिकीट हवे, अशी आग्रही भूमिका दटके यांनी घेतली होती. मात्र, हलबा समाजाचे प्राबल्य असलेल्या मध्य नागपुरातून आ. विकास कुंभारे यांचे तिकीट कापून दटके यांना उमेदवारी देण्याची रिस्क घेण्यास भाजप नेते तयार नाहीत. अशात पक्षहितासाठी महापौरपद घेऊन पुढील संधीवर दावा कायम ठेवण्याचा सल्ला पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी दटके यांना दिला आहे. या पार्श्वभूमीवर दटके महापौर होतील, असे निश्चित मानले जात आहे. असे असले तरी भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक ३० आॅगस्ट रोजी होत आहे. तीत महापौर व उपमहापौरपदाच्या उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब होईल.
खानापूर्तीसाठी शिवसेनेचे समर्थन
महापालिकेच्या निवडणुकीत भाजप-सेना युती होती. यापूर्वीही महापालिकेत युतीची सत्ता आली तेव्हा महापौर भाजपचा व उपमहापौर शिवसेनेचा, असे सूत्र पाळले गेले. मात्र यावेळी निवडणुकीनंतर भाजपने सेनेला डच्चू दिला. भाजपने अपक्षांना हाताशी धरून सत्तास्थापनेचा मार्ग सुकर केला. खानापूर्तीसाठी शिवसेनेचे समर्थन घेतले गेले. भाजपने उपमहापौरपदी संदीप जाधव यांची नियुक्ती केली. सव्वा वर्षांनंतर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्याच जैतुनबी अन्सारी या मुस्लीम समाजाच्या नगरसेविकेला उपमहापौरपद देण्यात आले. यावेळी अपक्षांनी लोकसभा निवडणुकीत केलेल्या कामाची दखल घेत, अपक्षांचे गटनेते मुन्ना पोकुलवार यांना उपमहापौरपद देण्याची तयारी भाजपने चालविली आहे. (प्रतिनिधी)