मुख्यमंत्र्यांचे मिशन मिहान
By Admin | Updated: November 3, 2014 00:39 IST2014-11-03T00:39:17+5:302014-11-03T00:39:17+5:30
मुंबईत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून कामाला लागलेले देवेंद्र फडणवीस नागपूरमध्येही कामाचा तोच झपाटा कायम ठेवणार आहेत. सोमवारी रामगिरीवर दोन महत्त्वपूर्ण बैठका आयोजित करण्यात आल्या

मुख्यमंत्र्यांचे मिशन मिहान
रामगिरीवर आज बैठका: नागपूर विभागाचा आढावा घेणार
नागपूर: मुंबईत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून कामाला लागलेले देवेंद्र फडणवीस नागपूरमध्येही कामाचा तोच झपाटा कायम ठेवणार आहेत. सोमवारी रामगिरीवर दोन महत्त्वपूर्ण बैठका आयोजित करण्यात आल्या असून त्यात मिहान आणि नागपूर विभागातील विविध योजनांचा आढावा घेण्यात येणार आहे.
विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यानच सक्रिय होणारी नागपूर विभागातील प्रशासकीय यंत्रणा नागपूरकर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून बैठकीच्या तयारीत व्यस्त आहे. सोमवारी सकाळी १० वाजता मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान ‘रामगिरी’येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मिहान प्रकल्पाच्या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली आहे. आमदार म्हणून काम करताना फडणवीस यांनी नेहमीच मिहान प्रकल्पाचा प्रश्न विधानसभेत वेळोवेळी मांडला व हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. मुख्यमंत्री झाल्यानंतर नागपूरमध्ये आल्यावर त्यांनी पहिली बैठक मिहान प्रकल्पाच्या संदर्भात आयोजित केली आहे. या बैठकीत मिहान प्रकल्पाशी संबधित प्रश्नांसह वीज आणि उद्योजकांच्या समस्यांवरही चर्चा करण्यात येणार आहे. या प्रकल्पाची सद्यस्थिती आणि अडचणी याबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती असून त्याचा निपटारा करण्यासाठी काही योजनांही त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे
काही निर्देशही अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे. सत्तेत आल्यास मिहानचा विकास जलद गतीने करू, असे आश्वासन भाजपने निवडणूक प्रचारात दिले होते हे येथे उल्लेखनीय.
मिहानची बैठक आटोपल्यावर दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री नागपूर विभागातील विविध विकास कामे आणि योजनांचा आढावा घेतील. संबंधित सर्व विभाग प्रमुखांना या बैठकीस उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. अपूर्ण राहिलेल्या योजना व इतरही कामे पूर्ण करण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील यासंदर्भातील प्रस्ताव या बैठकीत सादर केले जाण्याची शक्यता आहे.(प्रतिनिधी)