मनसेला खिंडार !
By Admin | Updated: January 14, 2015 04:14 IST2015-01-14T04:14:35+5:302015-01-14T04:14:35+5:30
मनसे नेतृत्वावर नाराज असलेले दरेकर, गीते भाजपात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येतच होत्या.

मनसेला खिंडार !
मुंबई : मुंबै बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर, वसंत गीते आणि रमेश पाटील या तीन माजी आमदारांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला, तर माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करीत मंगळवारी भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. मनसे सोडण्याच्या कारणाबाबत कुठलेही भाष्य करू नका, असा दानवे यांचा आदेश असल्याने दरेकर व अन्य नेत्यांनी त्याबाबत मौन बाळगले.
मनसे नेतृत्वावर नाराज असलेले दरेकर, गीते भाजपात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येतच होत्या. त्यावर आज शिक्कामोर्तब झाले. त्यांच्याबरोबर १२ जिल्हाध्यक्ष, चार जिल्हा परिषद सदस्य, दोन पंचायत समिती सभापती व तीन सदस्यांनीदेखील भाजपात प्रवेश केल्याचे जाहीर करण्यात आले. भाजपाला एक कोटी सदस्य नोंदवायचे आहेत. त्यामुळे अन्य पक्षातून जर मंडळी येत असतील तर त्यांना सदस्य करून त्यांचे पक्षात स्वागत केले जाईल, असे दानवे म्हणाले.
दरेकर यांच्यावर मुंबै बँक घोटाळ््याबाबत आरोप असताना त्यांना प्रवेश कसा दिला, असा सवाल केला असता दानवे म्हणाले की, आरोप असणे म्हणजे दोषी असणे नाही.
भाजपात प्रवेश केलेल्या एखाद्या व्यक्तीवरील आरोप सिद्ध झाले तर तत्काळ त्याला पक्षातून काढून टाकण्यात येईल, असेही रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केले. (विशेष प्रतिनिधी)