सॅनिटरी नॅपकिनबाबत सरकारकडून दिशाभूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 00:26 IST2018-07-24T00:26:04+5:302018-07-24T00:26:25+5:30
किमती कमी होणे शक्य नाही; जीएसटीचा परतावा मिळणार नाही

सॅनिटरी नॅपकिनबाबत सरकारकडून दिशाभूल
नागपूर : सरकारने सॅनिटरी नॅपकिन्सवरील १२ टक्के जीएसटी रद्द केला असला तरी च्या किमती कमी होण्याची शक्यता नाही. त्यामुळे जीएसटी रद्द करण्याच्या नावाखाली केद्र सरकारने निव्वळ दिशाभूल केली आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
जीएसटी रद्द झाल्यामुळे सॅनिटरी नॅपकिन्सच्या उत्पादक कंपन्यांना आता कच्च्या मालावर भरलेल्या जीएसटीचा परतावा मिळणार नाही व परिणामी किमती जवळपास त्याच राहतील, असे ओमेक एन्टरप्राईजेसमधील सूत्रांनी सांगितले.
एका नॅपकिनची उत्पादन किंमत साधारणत: २.२५ रुपये असते व त्यावर कच्च्या मालावर भरलेल्या जीएसटीचे ३० पैसे उत्पादकाला परत मिळतात. एकाची विक्री किंमत साधारणत: ३.१० रुपये असते. जीएसटी रद्द झाल्यानंतर उत्पादन किंमत २.२५ रुपयेच राहील पण कर परतावा मिळणार नाही, या क्षेत्रात तीव्र स्पर्धा असल्याने विक्री किंमत ३.१० रुपयेच राहील असे या सूत्रांचे म्हणणे आहे.
४५०० कोटींची उलाढाल
भारतात दरवर्षी ४५०० कोटी रुपयांचे सॅनिटरी नॅपकिन्स विकले जातात. बहुतांश बाजारपेठेवर बलाढ्य बहुराष्ट्रीय कंपन्यांचे वर्चस्व आहे, या कंपन्या लघु उद्योगाकडून हे पॅड्स बनवून घेऊन स्वत:च्या ब्रँडने विकतात. त्यामुळे ब्रँड नेमवर लागणारा १८ टक्के जीएसटी या कंपन्यांना भरावा लागतो. यामुळेही किमती कमी होण्याची शक्यता नाही, असे सूत्रांनी सांगितले.