मीरा रोडमध्ये अंधांसाठी १२ ते १६ लाखांत घर?
By Admin | Updated: November 19, 2014 05:02 IST2014-11-19T05:02:32+5:302014-11-19T05:02:32+5:30
म्हाडाच्या वतीने अंध-अपंगांसाठी बांधण्यात येणाऱ्या घरांसाठीची जाहिरात येत्या आठवडाभरात काढण्यात येणार आहे.

मीरा रोडमध्ये अंधांसाठी १२ ते १६ लाखांत घर?
मुंबई : म्हाडाच्या वतीने अंध-अपंगांसाठी बांधण्यात येणाऱ्या घरांसाठीची जाहिरात येत्या आठवडाभरात काढण्यात येणार आहे. कोकण मंडळाच्या मीरा रोडमधील अत्यल्प व अल्प गटातील घराच्या किमती अनुक्रमे १२ व १६ लाख असण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. मुंबई मंडळांच्या लॉटरीतील घरांच्या किमती निश्चित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
उच्च न्यायालयाने २०११-१२ या वर्षातील अंध व अपंग प्रवर्गातील राखीव घरांच्या लॉटरीची प्रक्रिया नोव्हेंबर अखेरपर्यंत सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामध्ये मुंबईतील ४९ व मीरा रोडमधील १७ घरांचा समावेश आहे. त्या वेळी जाहीर करण्यात आलेल्या किमतीमध्ये सरासरी १५ ते ७५ हजार रुपयांची वाढ अपेक्षित धरण्यात आलेली आहे.
अंध व अपंग संवर्गाबाबतच्या नियमाविरोधात २००९मध्ये उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्यामुळे दोन वर्षांतील लॉटरीतील ही घरे राखीव ठेवण्यात आली होती. न्यायालयाने या संवर्गामध्ये आता नव्याने निश्चित केलेल्या विविध ७ प्रवर्गांतील व्यक्तींना पात्र ठरविले आहे. त्यामध्ये पूर्ण अंध, कमी दृष्टी, कुष्ठरोगमुक्त, कर्णबधिर, अवयवातील कमतरता, गतिमंदत्व आणि मनोविकृती या प्रवर्गाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता त्यांनादेखील स्वस्त घरांचा लाभ घेणे शक्य होणार आहे. (प्रतिनिधी)