अल्पसंख्याक आयोग रद्द करण्यात यावा
By Admin | Updated: November 11, 2014 00:02 IST2014-11-10T20:44:16+5:302014-11-11T00:02:55+5:30
हिंदू महासभेच्या बैठकीत ठराव

अल्पसंख्याक आयोग रद्द करण्यात यावा
सातारा : या पूर्वीच्या सरकारच्या काळात मतांच्या खुशामतीसाठी नेमलेला अल्पसंख्याक आयोग नवीन सरकारने त्वरित रद्द करावा, अशी मागणी येथे झालेल्या हिंदू महासभेच्या बैठकीत ठरावाद्वारे करण्यात आली.
हिंदू महासभेची राज्य कार्यकारिणी सातारा येथे झाली. महाराष्ट्रातून कार्यकारिणीचे बहुसंख्यांक प्रतिनिधी उपस्थित होते. सभेच्या अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष अनुप केणी होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केल्यानंतर बैठकीस प्रारंभ झाला.
या बैठकीत संघटन वाढ, विधानसभेच्या निवडणुका, हिंदू महासभा शताब्दी वर्ष आदी विविध विषयांवर कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रारंभी हिंदू महासभा सातारा जिल्हाध्यक्ष अरुण बक्षी यांनी प्रदेशाध्यक्ष अनुप केणी यांचा सत्कार केला. कार्यकारिणी सदस्यांचा सत्कार दत्ता सणस व अधिवक्ता सतीश खानविलकर यांनी केला. प्रदेश प्रवक्ता दिनेशराव भोगले यांनी संघटनवाढीचे महत्त्व विशद केले तसेच हिंदू महासभा शताब्दी वर्ष भव्य प्रमाणात साजरे करणार असल्याचे सांगितले. बैठकीत अभिनेते महेशराव सावंत अधिवक्ता गोविंदराव तिवारी, नारायणशेट आग्रवाल, संजय कुलकर्णी, राजेंद्र शिंदे, अजिंक्य गावडे, प्रा. गजानन नेरकर, गोविंद पवार आदींनी मते व्यक्त केली. यावेळी राजेश नेसे, देविदास भंडगर, डॉ. विनायक मिराशी आदी उपस्थित होते. अनुप केणी यांनी हिंदू महासभेच्या राष्ट्रीय व प्रदेश स्तरावरची संघटनात्मक वाढीची माहिती
दिली. (प्रतिनिधी)