लग्नमंडपात अल्पवयीन नवरीचा आत्महत्येचा प्रयत्न
By Admin | Updated: December 19, 2014 04:35 IST2014-12-19T04:35:59+5:302014-12-19T04:35:59+5:30
अल्पवयीन असताना शिक्षण सोडून लग्न लावून देण्याच्या विरोधात नववधूने लग्नाच्या मंडपातच फिनाईल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे

लग्नमंडपात अल्पवयीन नवरीचा आत्महत्येचा प्रयत्न
उल्हासनगर : अल्पवयीन असताना शिक्षण सोडून लग्न लावून देण्याच्या विरोधात नववधूने लग्नाच्या मंडपातच फिनाईल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. आई-वडिलांसह नवरा मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उल्हासनगर पोलीस ठाण्यात सुरू आहे.
घाटकोपर येथे राहणाऱ्या सख्ख्या बहिणींचा विवाह उल्हासनगर कॅम्प नं.१ मधील तरुणासोबत उल्हासनगर हिरा मॅरेज हॉलमध्ये होणार होता. लग्नाची तयारी सुरू असताना १४ वर्षांच्या अल्पवयीन नववधूने स्वच्छतागृहात जाऊन फिनाईल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने लग्न मंडपात एकच खळबळ उडून झालेला प्रकार उल्हासनगर पोलीस ठाण्यात गेला. पोलीस अधिकारी अलका पाटील यांनी अल्पवयीन नववधूला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.
आई-वडिलांनी शिक्षण सोडून मनाविरोधात व अल्पवयीन असताना उल्हासनगरातील एका तरुणासोबत लग्नाचा घाट घातल्याची प्रतिक्रिया अल्पवयीन नववधूने पोलिसांना दिली आहे. मुलीचा विरोध डावलून मुलीचे लग्न लावून देण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार पोलीस तपासात उघड झाला आहे.
या प्रकाराला कंटाळून मुलीने लग्नाच्या मंडपात फिनाईल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर जाधव यांनी घटनेची चौकशी करून गुन्हा दाखल केल्याचे सांगितले. मुलीच्या आई-वडिलांसह नवऱ्या मुलावर गुन्हा दाखल करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.