अल्पवयीन मुलीवर सावत्र बापाचा अत्याचार
By Admin | Updated: August 2, 2014 02:49 IST2014-08-02T02:49:31+5:302014-08-02T02:49:31+5:30
एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर गेली दोन वर्षे सावत्र बापाचा लैंगिक अत्याचार सुरू असल्याचा प्रकार पूर्वेत उघडकीस आला असून बापाच्या या घृणास्पद कृत्याचा पर्दाफाश पीडित मुलीनेच केला आहे

अल्पवयीन मुलीवर सावत्र बापाचा अत्याचार
कल्याण : एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर गेली दोन वर्षे सावत्र बापाचा लैंगिक अत्याचार सुरू असल्याचा प्रकार पूर्वेत उघडकीस आला असून बापाच्या या घृणास्पद कृत्याचा पर्दाफाश पीडित मुलीनेच केला आहे. दरम्यान या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या शमसुद्दीन निप्पलवाला (५८) या नराधमाने न्यायालयात जामिनासाठी दाखल केलेल्या अर्जावर १४ आॅगस्टला सुनावणी होणार आहे.
सावत्र बापाच्या सुरू असलेल्या अत्याचाराबाबत पीडित मुलीने आपल्या आईला सांगितले होते़ परंतु, आईचा यावर विश्वास बसत नव्हता़
उलट आईकडून तिची समजूत काढली जात होती. त्यामुळे पीडित मुलीने आत्महत्या करण्याचा निर्णयदेखील घेतला होता. याबाबत तिने लिहिलेले पत्र तिच्या आईच्या हाती लागले. हे पत्र वाचून पुन्हा तिला समजावण्यात आले.
याप्रकरणी आईकडून शमसुद्दीनला जाब विचारण्यात आला. मात्र, त्याने याचा इन्कार केला. दुसरीकडे शमसुद्दीनच्या वाढत असलेल्या लीला अत्याचारपीडित मुलीने आपल्या मोबाइल कॅमेऱ्यामध्ये कैद केल्या आणि आईला दाखवल्या़ त्या पाहून तिने मुलीसह थेट कोळसेवाडी पोलीस ठाणे गाठले आणि शमसुद्दीनविरोधात तक्रार दाखल केली. दाखल तक्रारीवरून पोलिसांनी त्यास अटक केली आहे. सध्या त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. दरम्यान शमसुद्दीनने जामीन मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता़
शुक्रवारी सुनावणीदरम्यान पीडित मुलीचे वकील आर.ए. नायर यांनी जामिनाला विरोध केला आहे. ही सुनावणी १४ आॅगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. (प्रतिनिधी)