अल्पवयीन मुलीचा खून करुन मृतदेह फेकला विहिरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2016 19:59 IST2016-11-01T19:59:39+5:302016-11-01T19:59:39+5:30
पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या सहा वर्षीय अल्पवयीन मुलीचा खून करुन तिचा मृतदेह विहिरीत फेकून दिल्याचा प्रकार ३१ आॅक्टोबर रोजी उघडकीस

अल्पवयीन मुलीचा खून करुन मृतदेह फेकला विहिरीत
>ऑनलाइन लोकमत
सोनपेठ (जि. परभणी), दि. 01 - पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या सहा वर्षीय अल्पवयीन मुलीचा खून करुन तिचा मृतदेह विहिरीत फेकून दिल्याचा प्रकार ३१ आॅक्टोबर रोजी उघडकीस आला आहे. दरम्यान, या प्रकरणी १ नोव्हेंबर रोजी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल झाला नव्हता.
सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथील अनुसया श्याम गायवळ ही ६ वर्षांची मुलगी तिचे आजोबा प्रभाकर गायवळ आणि आजी काशीबाई गायवळ यांच्यासमवेत शेळगाव येथे रहात असे. या अल्पवयीन मुलीच्या वडिलांचे निधन झाले असून, आईने तिला सोडून दिले आहे. अनुसयाचे आजी आणि आजोबा २७ आॅक्टोबर रोजी शेतात गेले होते. त्या दिवशीच अनुसया ही घरातून गायब होती. दरम्यान, अनुसया घरात एकटी असल्याचे पाहून अज्ञात व्यक्तीने तिला पळवून नेल्याची तक्रार २९ आॅक्टोबर रोजी सोनपेठ पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली.
३१ आॅक्टोबर रोजी शेळगाव शिवारातील शेतात काम करीत असलेल्या नागेश लोंढे या मजुराला काही तरी मेले असल्याचा वास आला. त्यावरुन त्यांनी शेतमालकास बोलावले. शोध घेतला असता, पोत्यात बांधलेले प्रेत विहिरीतील पाण्यात तरंगत असल्याचे दिसून आले. गावातील पोलिस पाटलांनी ही माहिती पोलिसांना दिली. श्वानपथकासह पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी हे पोते विहिरीबाहेर काढून पोते उघडले असता त्यात छिन्नविछिन्न अवस्थेत अनुसयाचा मृतदेह आढळून आला. दरम्यान, बलात्कार करुन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने अनुसयाचा गळा आवळून खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. अनुसयाच्या मृतदेहावर नांदेड येथे शवविच्छेदन करण्यात आले असून, १ नोव्हेंबर रोजी अनुसयाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, श्वानपथकाच्या मदतीने पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरू आहे.
शेळगावात पाळला बंद
या घटनेच्या निषेधार्थ १ नोव्हेंबर रोजी गावकºयांनी बंद पाळला. गावातून निषेध रॅली काढली. तसेच शोकसभा घेऊन आपल्या शोकभावना व्यक्त केल्या. तसेच खा.बंडू जाधव, आ.मोहन फड, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राजेश विटेकर यांनी पीडित मुलीच्या घरी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले.