‘त्या’ अल्पवयीन बांग्लादेशमधील; पालकांशी संपर्क
By Admin | Updated: May 13, 2015 00:54 IST2015-05-12T23:20:01+5:302015-05-13T00:54:05+5:30
या मुलींना खरेदी करून आणले का, फसवणूक करून, हे तपासात अद्याप निष्पन्न झालेले नाही.

‘त्या’ अल्पवयीन बांग्लादेशमधील; पालकांशी संपर्क
सांगली : येथील काळ्या खणीजवळील प्रेमनगरमध्ये वेश्या वस्तीत सापडलेल्या ‘त्या’ तीन अल्पवयीन मुली बांग्लादेशमधील असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या मुुलींना येथे अपहरण करून आणले असावे किंवा पालकांकडून त्यांना खरेदी केले असावे, या दोन शक्यता धरून तपास सुरू आहे. यासाठी पालकांशी संपर्क साधण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे. मात्र अद्याप संपर्क न झाल्याने तपासात कोणतीही प्रगती झालेली नाही.चार दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष पथकाने काळ्या खणीजवळील प्रेमनगरमधील वेश्या वस्तीत छापा टाकून तीन अल्पवयीन मुलींची सुटका केली आहे. रूना अन्सारी हिच्याकडे या मुली रहात होत्या. ती त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचे स्पष्ट झाले होते. या मुलींची न्यायालयाने बालसुधारगृहात रवानगी केली आहे. तीनही मुली बांग्लादेशमधील असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांना या व्यवसायात कसे आणले? याचा उलगडा करण्यासाठी रूना अन्सारी हिच्याकडे चौकशी करण्यात आली. मात्र तिच्याकडून कोणतीही माहिती मिळाली नाही.
या मुलींना खरेदी करून आणले का, फसवणूक करून, हे तपासात अद्याप निष्पन्न झालेले नाही. पालकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरूआहे. येत्या दोन-तीन दिवसांत सर्व बाबी स्पष्ट होतील, असे पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
मुलींच्या वयाच्या दाखल्याची खात्री करणार
प्रेमनगरमधून यापूर्वीही अल्पवयीन मुलींची सुटका झाली आहे. मुलींच्या वयाचे (शाळा सोडल्याचे) दाखले पालक सादर करून स्वत:चा व दलाल महिलेचा बचाव करून घेतात. या प्रकरणातही असेच घडण्याची शक्यता आहे. मात्र पोलिसांनी मुलींची सांगलीच्या शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली आहे. यामध्ये तिघीही अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे पालकांनी मुली सज्ञात असल्याचे जन्माचे दाखल दिले असले तरी, त्यावर विश्वास ठेवणार नाही. कारण हे दाखले बोगस असू शकतात, असे निरीक्षक घनवट यांनी सांगितले.