मंत्रालयाने तारीख जाहीर करावी; तरच उपोषण मागे
By Admin | Updated: September 27, 2015 01:35 IST2015-09-27T01:35:01+5:302015-09-27T01:35:01+5:30
केंद्र सरकारने आमच्याबरोबर चर्चेसाठीची तारीख जाहीर करावी, तरच सुरू असलेले उपोषण मागे घेतले जाईल, असे आंदोलनाचे नेतृत्व करणारे विकास अर्स

मंत्रालयाने तारीख जाहीर करावी; तरच उपोषण मागे
पुणे : केंद्र सरकारने आमच्याबरोबर चर्चेसाठीची तारीख जाहीर करावी, तरच सुरू असलेले उपोषण मागे घेतले जाईल, असे आंदोलनाचे नेतृत्व करणारे विकास अर्स आणि राकेश शुक्ला यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
एफटीआयआयच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीच्या विरोधार्थ एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी १0६ दिवसांपासून आंदोलन सुरूकेले आहे. त्याकडेही सरकारने दुर्लक्ष केल्याने गेल्या १७ दिवसांपासून विद्यार्थ्यांनी उपोषण सुरूकेले आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाला पत्र लिहून चर्चेसाठी हाक दिली होती. त्याला प्रतिसाद देत मंत्रालयाने विद्यार्थ्यांच्या कोर्टात चेंडू टाकत उपोषण मागे घेतले तरच, चर्चा करण्यात येईल असे सांगितले. त्यावर विद्यार्थ्यांनी मंत्रालयालाच पत्र लिहून तुम्ही चर्चेसाठी तारीख कळवा तरच उपोषण मागे घेऊ असे सांगून पुन्हा मंत्रालयाकडे चेंडू सरकवला आहे.
राकेश शुक्ला म्हणाला, गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे, तरीही सरकारने आंदोलनाकडे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे आम्ही उपोषणाला सुरुवात केली आहे. उपोषण मागे घ्या, तरच चर्चा करू, असे सांगण्यात आले. मात्र आम्ही पत्र लिहून कळविले आहे की, चर्चेसाठी तारीख कळवा, तरच उपोषण मागे घेऊ. मात्र, आंदोलन स्थगित करणार नाही, असे स्पष्ट केले आहे.