मंत्री वायकर यांचे सहा ‘झोपु’ प्रकल्प!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2016 04:58 IST2016-06-29T04:58:07+5:302016-06-29T04:58:07+5:30

गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर चांगलेच अडचणीत सापडले आहेत. वायकर यांच्या भागीदारीत अंधेरी आणि जोगेश्वरी पूर्वेला सहा झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प सुरू

Minister Waikar's six 'Sutu' project! | मंत्री वायकर यांचे सहा ‘झोपु’ प्रकल्प!

मंत्री वायकर यांचे सहा ‘झोपु’ प्रकल्प!


मुंबई : गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर चांगलेच अडचणीत सापडले आहेत. वायकर यांच्या भागीदारीत अंधेरी आणि जोगेश्वरी पूर्वेला सहा झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प सुरू असून, त्यांची किंमत सुमारे १००० कोटी एवढी आहे. ऐश्वर्या लाईट्स आणि ऐश्वर्या अवंत या वायकर यांच्याच कंपन्या आहेत, असा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी पत्रकार परिषदेत केला.
स्पोर्ट्स क्लबच्या नावे पालिकेचा भूखंड हडप केल्याचा आरोप त्यापूर्वीच झाला आहे. आता त्यांच्या भागीदारीत इन्कलाब नगर, राजश्री निवास अंधेरी पूर्व, श्यामनगर, महाकाली गुंफेजवळ, अंधेरी रामबागमध्ये २ प्रकल्प असे सहा अनधिकृत प्रकल्प सुरू असल्याचे समोर आले आहे. त्याचे सुमारे साडेतीन लाख स्केअर फूट एवढे अनधिकृत बांधकाम झालेले आहे. हरमीत सिंग गुप्ता हा या कंपन्यांचा मूळ मालक असून, वायकर भागीदार आहेत. हरमीतला पुढे करून वायकर सगळे प्रकल्प राबवित आहेत. या सर्व प्रकल्पांना वायकर यांनी मंत्री पदाचा दुरुपयोग करून जलदगतीने मंजुरी मिळवली आहे, असा आरोप निरुपम यांनी केला आहे.
गृहनिर्माण राज्यमंत्री पदाचा दुरुपयोग करून वायकर कंपन्यांना फायदा करून घेत आहेत. प्रकल्पांच्या मंजुरीसाठी वायकर यांनी शासकीय निवासस्थानी बैठका घेतल्या. शिवाय, त्यांनी आपल्या प्रकल्पांना ‘ना विकास क्षेत्रा’त आणि ‘प्रतिबंधित क्षेत्रा’त ही परवानगी दिली आहे. या परवानग्या त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा दुरुपयोग करून अनधिकृतपणे मिळविलेल्या आहेत, असे निरुपम यांनी म्हटले आहे. (विशेष प्रतिनिधी)
पदावरून दूर करा...
जोगेश्वरी गुफा संरक्षित असून, त्याच्या १०० मीटर परिसरात बांधकाम करू नये, असा पुरातत्त्व विभागाचा नियम आहे. न्यायालयाचेही तसे आदेश आहेत. तरी नियम धाब्यावर बसवून वायकर यांच्या भागीदारीतील एसआरए प्रकल्प तिथे सुरू आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी वायकर यांना ताबडतोब मंत्री पदावरून दूर करावे, अशी मागणी संजय निरुपम यांनी केली.
२०११ला मी ऐश्वर्या लाईट्स कंपनीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे निरुपम यांचे सर्व आरोप निराधार आहेत.
-रवींद्र वायकर, गृहनिर्माण राज्यमंत्री

Web Title: Minister Waikar's six 'Sutu' project!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.