...तर तोंड दाखवायला जागा मिळणार नाही; नितीन देसाईंवरून मंत्री उदय सामंताचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 12:40 PM2023-08-16T12:40:01+5:302023-08-16T12:41:22+5:30
आम्ही गद्दार होतो, खोकेवाले होतो असं म्हणता, आता अजित पवार आमच्यासोबत आलेत. तुमच्यात हिंमत असेल तर अजित पवार गद्दार, खोकेवाले म्हणून दाखवा असं आव्हानही मंत्री सामंतांनी दिले आहे.
रत्नागिरी – कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या आत्महत्येवरून आता मंत्री उदय सामंत यांनी केलेले विधान चर्चेत आले आहे. अलीकडेच कर्जाला कंटाळून नितीन देसाईंनी आत्महत्या केली होती. त्यांच्या निधनानं अनेक प्रश्न उपस्थित झाले. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्यात नितीन देसाईंचं दु:ख काय होतं हे जर मी सांगितले तर काहींना तोंड दाखवायला जागा राहणार नाही असं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे त्यामुळे सामंत यांचा रोख कुणाकडे आहे हा प्रश्न निर्माण होतो.
मंत्री उदय सामंत म्हणाले की, नितीन देसाई माझ्याएवढे कोणाच्या जवळचे नव्हते. नितीन देसाई जायच्या अगोदर १ महिन्यापूर्वी मला भेटले होते. जे काही सांगितले जाते, जे काही कळले नसेल ते नितीन देसाईंचे दु:ख काय होतं हे मला माहिती आहे. हे जर मी बाहेर काढले तर काही लोकांना पुन्हा रत्नागिरीला तोंड दाखवायला जागा उरणार नाही. त्यामुळे मोठमोठ्या गोष्टी करण्यापेक्षा आपण गेल्या ५ वर्षात ९ वर्षात काय केले हे जनतेला सांगण्याची वेळ आली आहे असं त्यांनी म्हटलं.
त्याचसोबत आम्ही गद्दार होतो, खोकेवाले होतो असं म्हणता, आता अजित पवार आमच्यासोबत आलेत. तुमच्यात हिंमत असेल तर अजित पवार गद्दार, खोकेवाले म्हणून दाखवा. आम्ही सहनशील आहोत आणि जो सहनशील असतो त्याच्यावर संस्कार असतात. ऐकून कोण घेतो तर ज्याच्या संस्कार आहेत तो ऐकतो. अजितदादांनी जी घटना केली त्याच्यानंतर काही जणांची वाचा गेली. अजितदादांसारखा नेता एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस चांगले काम करतात म्हणून त्यांच्यासोबत येतात. आगामी लोकसभा निवडणुकीत ४८ पैकी ४५ जागा या तीन नेत्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात जिंकून येतील असा विश्वास मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.
नितीन देसाई प्रकरणात आरोपींना मुदतवाढ
नितीन देसाई यांच्या आत्महत्येच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने ईसीएल फायनान्स कंपनी, एडलवाईज ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक व इतर आरोपींनी १४ ऑगस्ट रोजी हजर न राहता आठ दिवसांची वाढीव मुदत द्यावी, अशी विनंती मेलद्वारे केली होती. त्यानुसार पोलिसांनी आठ दिवसांनी हजर राहण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे आता आठ दिवसांनंतर अधिकाऱ्यांची चौकशी होणार आहे. ८ आणि ११ ऑगस्टला आरोपींची नऊ तास खालापूर पोलिस ठाण्यात चौकशी झाली. १४ ऑगस्टला पुन्हा चौकशीला हजर राहण्याची नोटीस दिली होती. संबंधितांनी न्यायालयात रिट पिटिशन दाखल केले आहे. त्याची सुनावणी १८ ऑगस्टला होणार आहे.