मंत्री एकनाथ शिंदे यांना जिवे मारण्याची धमकी
By Admin | Updated: December 20, 2014 02:39 IST2014-12-20T02:39:30+5:302014-12-20T02:39:30+5:30
शिवसेनेचे नेते आणि राज्याचे सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांना शुक्रवारी जिवे मारण्याची धमकी देणारा फोन आला

मंत्री एकनाथ शिंदे यांना जिवे मारण्याची धमकी
नागपूर : शिवसेनेचे नेते आणि राज्याचे सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांना शुक्रवारी जिवे मारण्याची धमकी देणारा फोन आला. त्याबाबत शिंदे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
शिंदे हे रवि भवनातील आपल्या कॉटेज क्रमांक १३ मध्ये बसलेले असताना त्यांच्या मोबाइलवर फोन आला. एरव्ही १० क्रमांकाचा मोबाइल क्रमांक असतो, पण हा १२ आकडी क्रमांक होता. समोरील व्यक्तीने शिंदे यांना शिवीगाळ सुरू केली.
तू नहीं सुधरेंगा नहीं क्या, तुझे हम देख लेंगे, असे समोरच्या व्यक्तीने शिंदेंना धमकावणे सुरू केले. शिंदे यांनी मग ‘तु कौन बोल रहा हैं,’ असे विचारले. त्यावर ‘तु सिर्फ सुनने का काम कर. तेरे दिन भर गए हैं, साले तुझे उडा देंगे’, असे समोरची व्यक्ती म्हणाली.
मात्र त्यावर शिंदे यांच्यातील शिवसैनिक तत्काळ जागा झाला. ‘मंै तुझे कहाँ मिलने आऊँ बता, मैं अभ्भी आता हूँ’, असे आव्हान दिले. त्यावर ‘तेरे आने की जरुरत नहीं, मंै खुद पहुंच जाऊंगा,’ असे ती व्यक्ती म्हणाली.
शिंदे यांनी सायंकाळी ७ च्या सुमारास नागपूरचे पोलीस आयुक्त के. के. पाठक यांना फोनवरून सगळा प्रकार कथन केला. पाठक यांनी तातडीने पोलीस कर्मचाऱ्यांना रवि भवनात पाठवून शिंदे यांचा जबाब घेतला. त्यात शिंदे यांनी घडलेला प्रसंग सांगितला आणि आपल्या जिवाला धोका असल्याचे नमूद केले.
राज्याचे सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांना कोणी आणि कुठून फोन केला, त्या व्यक्तीचा नंबर कॉलर आयडीवरून होता का, याचा तपास नागपूर पोलिसांनी तातडीने सुरू केला आहे. (विशेष प्रतिनिधी)