कोट्यवधींच्या मालमत्ता वाऱ्यावर

By Admin | Updated: October 20, 2016 04:06 IST2016-10-20T04:06:44+5:302016-10-20T04:06:44+5:30

अपुऱ्या मनुष्यबळाअभावी सुरक्षा पुरवायची तरी कशी, असा प्रश्न सध्या केडीएमसीच्या सुरक्षा विभागाला पडला आहे.

Millions of property in the wind | कोट्यवधींच्या मालमत्ता वाऱ्यावर

कोट्यवधींच्या मालमत्ता वाऱ्यावर


डोंबिवली : अपुऱ्या मनुष्यबळाअभावी सुरक्षा पुरवायची तरी कशी, असा प्रश्न सध्या केडीएमसीच्या सुरक्षा विभागाला पडला आहे. यामुळे महापालिकेच्या कोट्यवधींच्या मालमत्ता वाऱ्यावर पडल्या असून तेथील सुरक्षा धोक्यात आली आहे.
सुरक्षारक्षकांची २६२ पदे मंजूर आहेत. त्यातील १२९ पदे सध्या रिक्त आहेत. डोंबिवली विभागासाठी ५५ सुरक्षारक्षक असले तरी प्रत्यक्षात ४८ जणच कार्यरत आहेत. एकंदरीतच आवाका पाहता तेथे ८५ सुरक्षारक्षकांची आवश्यकता आहे. काहींची नेमणूक डोंबिवलीसाठी झाली असताना त्यांनी वर्षानुवर्षे कल्याणमधील महापालिका मुख्यालयात ठाण मांडल्याचे वास्तव आहे. नवीन भरती होणाऱ्यांचा कल सर्वसाधारणपणे अग्निशामक दल आणि लिपिक होण्याकडे असतो. निवृत्त झालेल्या सुरक्षारक्षकांच्या जागा रिक्त राहत असल्याने मनुष्यबळाची कमतरता नेहमी जाणवते. या परिस्थितीवर तोडगा म्हणून केडीएमसीने महाराष्ट्र सुरक्षारक्षक मंडळाचे ३४ जण घेण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, आजवर याला मुहूर्त मिळालेला नाही.
सुरक्षारक्षकांच्या कमतरतेमुळे उद्यान तसेच बंद अवस्थेत असलेल्या महापालिकेच्या कोट्यवधींच्या मालमत्ता वाऱ्यावर पडल्या आहेत. सूतिकागृह, बालभवन, पुसाळकर उद्यान, पु.भा. भावे सभागृहाची वास्तू, अष्टगणेश उद्यान, महात्मा गांधी उद्यान या मालमत्तांची सुरक्षा सुरक्षारक्षक नसल्याने धोक्यात आली आहे. यात मद्यपी, गर्दुल्ले आणि प्रेमीयुगुल यांना मोकळे रान मिळाले आहे. (प्रतिनिधी)
>क्रीडासंकुल परिसराची जबाबदारी एकावरच
विशेष म्हणजे, सुरक्षारक्षकांची कमतरता असल्याने हभप सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल, तरणतलाव, भांडार विभाग, ‘इ’ प्रभाग कार्यालय या मालमत्तांच्या सुरक्षेची जबाबदारी केवळ एकाच सुरक्षारक्षकावर आहे. या परिस्थितीमुळे सुरक्षारक्षकांच्या सार्वजनिक सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. जादा कामाचा ताण पडत असल्याने सुरक्षारक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे.

Web Title: Millions of property in the wind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.