खंडित वीजपुरवठ्यामुळे कोट्यवधींचे नुकसान
By Admin | Updated: July 4, 2016 02:00 IST2016-07-04T02:00:54+5:302016-07-04T02:00:54+5:30
एमआयडीसीतील ‘टी ब्लॉक’मध्ये रविवारी सकाळी सात वाजल्यापासून वीजपुरवठा खंडित झाल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले.

खंडित वीजपुरवठ्यामुळे कोट्यवधींचे नुकसान
भोसरी : एमआयडीसीतील ‘टी ब्लॉक’मध्ये रविवारी सकाळी सात वाजल्यापासून वीजपुरवठा खंडित झाल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे दिवसभर वीजपुरवठा खंडित झाला होता. कामगारांना बसून पगार द्यावा लागला व उत्पादनही ठप्प झाले. यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचे उद्योजकांनी सांगितले.
एमआयडीसीतील टी ब्लॉकमध्ये ५०० ते ६०० युनिट आहेत. सर्वच ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाल्याने उद्योजकांचे नुकसान झाले. सकाळी सात वाजल्यापासून महावितरणाच्या अधिकाऱ्यांना कळवूनसुद्धा सायंकाळपर्यंत वीजपुरवठा सुरळीत होऊ शकला नाही. काम सुरू आहे, थोड्या वेळात वीज येईल, अशी उत्तरे अधिकाऱ्यांकडून मिळत होती. विद्युत महावितरणकडून दररोज एमआयडीसीतील कोणत्या ना कोणत्या भागात वीजपुरवठा खंडित केला जातो. तसेच अनेक वेळा अधिकाऱ्यांशी संपर्क साधूनसुद्धा तीन ते चार तास वीजपुरवठ्यापासून वंचित राहावे लागते, असे आरोपही उद्योजकांनी केले.
महावितरणचे कार्यकारी अभियंता एस. एल. शिंदे म्हणाले, तांत्रिक कारणामुळे बिघाड झाली होती. वीजपुरवठा लवकरच सुरळीत करण्यात येणार आहे. (वार्ताहर)
> टी ब्लॉकमध्ये सकाळी सात वाजल्यापासून वीजपुरवठा खंडित झाला आहे. येथे सुमारे ६०० युनिट आहेत. उद्योजकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. महावितरणचे अधिकारी केवळ चालढकल करतात. एमआयडीसीत प्रत्येक भागात दररोज असे प्रकार घडतात. महावितरणकडून दुर्लक्ष केले जाते.
- संदीप बेलसरे, अध्यक्ष पिंपरी-चिंचवड लघुउद्योजक संघटना