लाखमोलाची ‘लाख’!
By Admin | Updated: May 22, 2014 22:29 IST2014-05-22T22:08:26+5:302014-05-22T22:29:40+5:30
दागिणे निर्मितीपासून ते स्फोटकांच्या सुरक्षेपर्यंत नानाविध उपयोग

लाखमोलाची ‘लाख’!
अकोला: सोन्याच्या दागिण्यांपासून स्फोटकांच्या सुरक्षेपर्यंत नानाविध उपयोग असलेल्या आणि त्यामुळे ह्यलाखमोलाची लाखह्ण असे वर्णन केल्या जाणार्या लाखेचे उत्पादन आता विदर्भातील शेतकरीही घेऊ लागला आहे. लाखेच्या जागतिक बाजारपेठेवर भारताचा कब्जा आहे. आता विदर्भातील शेतकरीही लाखचे उत्पादन घेऊ लागले असून, त्यांना कमी खर्चात अधिक उत्पादन घेता यावे, याकरीता कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आठ हजार शेतकर्यांना प्रशिक्षण दिल्या जात आहे. लाखेच्या अल्प खर्चाच्या शेतीमुळे विदर्भातील गोंदिया जिल्हयात सुमारे ४0 ते ५0 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल होत आहे. लाखेच्या शेतीमुळे मुख्यत्वे आदिवासी भागातील शेतकर्यांना रोजगार मिळाला आहे. लाखेचे उत्पादन घेण्यात भारत जगात आघाडीवर असून, विदर्भातील गोंदिया, गडचिरोली व इतर काही भागांमध्ये पळस, बोर व कुसूम या वृक्षांवर लाखेचे उत्पादन घेतले जात आहे. उत्पादनात अधिक वाढ व्हावी, यासाठी कृषी विज्ञान केंद्रांनी लाख उत्पादनावर लक्ष केंद्रित केले आहे. एका झाडापासून जवळपास ७00 ते ८00 रू पयांचे उत्पादन मिळते, तर खर्च १00 रुपयांपेक्षाही कमी आहे. एक किलोग्रॅम लाख बाजारात ४00 ते ५00 रू पयांना विकल्या जाते. पळस, बोर, कूसूम अशा फारसा इतर उपयोग नसलेल्या वृक्षांवर लाख उत्पादन घेतले जात असल्यामुळे, या शेतीसाठी कोणतीही मोठी गुंतवणूक करावी लागत नाही, हे येथे उल्लेखनीय आहे.
** सहा महिन्यात ४५ किलोचे उत्पादन
पूर्व विदर्भातील गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यात, निसर्गत: वाढलेले पळस व कुसूम वृक्ष मोठय़ा प्रमाणात आढळून येतात. कुसूम (स्लेईचेरा ओलिओसा) किंवा कोसम हा सॅपीनडेसी या कुळातील वृक्ष असून, ह्यलाखवृक्षह्ण म्हणूनच ओळखला जातो. मोह या वृक्षासारखाच हा वृक्ष आकाराने मोठा असतो. या वृक्षावर उन्हाळा आणि हिवाळा या दोन्ही ऋतूंमध्ये लाखेचे उत्पादन घेता येते.
** किडींची निर्मिती
लाख कीड आकाराने सुक्ष्म असून, उपजिविकेसाठी ती कुसूम, बोर, पळस आदी वृक्षांचे रसशोषण करते आणि स्वसरंक्षणासाठी तोंडातून लाळ सोडून स्वत:भोवती आवरण तयार करते. त्या आवरणालाच लाख म्हणतात. लाख वाळल्यावर ती वृक्षावरू न काढली जाते
**लाखेचा उपयोग
सोन्याचे दागिणे बनविण्यासाठी लाखेचा उपयोग मोठय़ा प्रमाणात केल्या जातो. लष्कराद्वारा वापरल्या जाणार्या स्फोटकांना अति तापमानापासून वाचविण्यासाठीही लाख वापरली जाते. महत्वाचे दस्तावेज सिलबंद करण्यासाठीही लाखेचा वापर करतात. त्याशिवाय वाहन उद्योग, विजेचे दिवे, तसेच सर्वच प्रकारच्या चॉकलेटच्या आवरणांसाठीही लाखेचा वापर होतो. लाख अशी विविधोपयोगी आहे.
** एक वर्षात साडेतीन लाखाचे उत्पादन!
गोदींया जिल्हयातील शेतकरी गणेश तिल्लारे यांनी लाख शेतीतून गतवर्षी साडेतीन लाखाचे उत्पन्न मिळविले असल्याचे, त्यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले. यंदा मात्र भाव पडले असल्यांची खंतही त्यांनी व्यक्त केली. .