तलासरी अंगणवाड्यांत लाखोंचा कपाट घोटाळा
By Admin | Updated: July 4, 2016 03:51 IST2016-07-04T03:51:08+5:302016-07-04T03:51:08+5:30
अंगणवाडयासाठी कपाटे घेण्यासाठी आलेला निधी अंगणवाडी कार्यकर्त्याकडून पुन्हा जमा करून त्यांना निकृष्ट दर्जाची कपाटे पुरवून त्यात अधिकाऱ्यांनी मोठा भ्रष्टाचार

तलासरी अंगणवाड्यांत लाखोंचा कपाट घोटाळा
सुरेश काटे,
तलासरी- अंगणवाडयासाठी कपाटे घेण्यासाठी आलेला निधी अंगणवाडी कार्यकर्त्याकडून पुन्हा जमा करून त्यांना निकृष्ट दर्जाची कपाटे पुरवून त्यात अधिकाऱ्यांनी मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ चौधरी यांनी केला असून दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे.
तलासरी तालुक्यातील १५३ अंगणवाडयांना कपाट व खुर्ची खरेदी साठी प्रत्येकी रुपये पाच हजार प्रमाणे सात लाख पासष्ट हजाराचे अनुदान आले. व ते प्रत्येक अंगणवाडी कार्यकर्त्याच्या बँक खात्यात जमाही करण्यात आले. त्यातून त्यांनी चांगल्या दर्जाची कपाटे खरेदी करावयाची होती.
परंतु आलेल्या अनुदानातून कार्यकर्त्याना कपाटे खरेदी करू न देता अनुदान कार्यालयात पुन्हा जमा करा, आपण एकत्र कपाटे खरेदी करून पुरवठा करू असे आदेशिण्यात आले. त्यामुळे नाइलाजाने अंगणवाडी कार्यकर्त्यांनी रुपये पाच हजाराचे अनुदान कार्यालयात जमा केले. त्यातून चांगल्या दर्जाची कपाटे मिळणे अपेक्षित होते परंतु ठेकेदाराने पुरवठा केलेल्या कपाटांची दारे गळून पडली. व त्यांचा दर्जा स्पष्ट झाला. आता अधिकाऱ्यांना ही बोलता येत नाही आणि कपाट वापरता येत नाही. अशा स्थितीत अंगणवाडी कार्यकर्त्यांनी चौधरी यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी अंगणवाडयांना भेट देऊन पाहणी केली असता दोन ते अडीच हजार रुपयात मिळणारी निकृष्ट दर्जाची कपाटे पुरविल्याचे आढळून आले.
या बाबत एकात्मिक बाल विकास प्रकल्प तलासरीचे अधिकारी मोरे यांच्या कडे विचारणा केली असता अनुदान कार्यकर्त्याच्या खात्यावर जमा करण्यात आले असून ते त्यांनी संघटने मार्फत एकत्र जमा करून कपाटे खरेदी केली असा खुलासा केला. त्यामुळे आता या भ्रष्टाचाराचा सूत्रधार कोण? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.