अधिकाऱ्यांकडे कोट्यवधींची अपसंपदा
By Admin | Updated: November 17, 2014 00:54 IST2014-11-17T00:54:01+5:302014-11-17T00:54:01+5:30
बंधाऱ्याच्या बांधकामात भ्रष्टाचार करणाऱ्या १४ पैकी ४ आरोपींकडे एसीबीच्या पथकाला बेहिशेबी मालमत्तेचे घबाड सापडले. यापैकी सर्वाधिक १ कोटी ३० लाखांची मालमत्ता जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी

अधिकाऱ्यांकडे कोट्यवधींची अपसंपदा
बंधारे बांधकामाचा घोटाळा : चौघांच्या घराची झडती
नागपूर : बंधाऱ्याच्या बांधकामात भ्रष्टाचार करणाऱ्या १४ पैकी ४ आरोपींकडे एसीबीच्या पथकाला बेहिशेबी मालमत्तेचे घबाड सापडले. यापैकी सर्वाधिक १ कोटी ३० लाखांची मालमत्ता जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव बापूजी भांडारकर यांच्याकडे मिळाली आहे. दरम्यान, चौघांच्या घरझडतीची कुणकुण लागताच इतरांनी आपली बेहिशेबी मालमत्ता दडवण्यासाठी धावपळ सुरू केली आहे.
२००६-०७ मध्ये नागपूर जिल्हा परिषदेकडून ३० बंधारे बांधकामासाठी २.५८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. या बंधाऱ्याचे कागदोपत्री बांधकाम करून संबंधित अधिकाऱ्यांनी त्यावेळी लाखोंची अफरातफर केली. या गैरप्रकाराची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) कडे आली होती. एसीबीने संबंधित वरिष्ठांकडून त्याची सखोल आणि प्रदीर्घ चौकशी केली. या चौकशीत ६५ लाखांच्या निधीची अफरातफर झाल्याचे उघड झाले. त्यावरून एसीबीने लघु पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता बलदेव माधव सांगोडे (५९), चंद्रपूर जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता व्यंकट आयला सोमयाजूला (५९), सिंचन विभागाच्या नरखेड उपविभागाचे सेवानिवृत्त उपअभियंता नामदेव अप्पा गजभिये (५९), जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पुरवठा विभागाचे शाखा अभियंता नंदकिशोर नारायणदास पुरोहित (४६), सिंचन विभागाचे दिलीप सुधाकर सातफळे (४७), सेवानिवृत्त अतिरिक्त मुख्य कार्यकारी अभियंता कृष्णराव लक्ष्मण झलके (६१), जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव भांडारकर वरुडचे उच्च श्रेणी गटविकास अधिकारी प्रकाश तट्टे, खाजगी कंत्राटदार वसंत चंद्रभान निकाजू, चंदू केशव चरपे, अशोक एम. ठाकूर, राहुल रमेश श्रीवास्तव, यशवंत रामराव काळबांडे, गंगाधर कुमेरिया या १४ जणांविरुद्ध एसीबीचे अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक मिलिंद तोतरे यांनी गुन्हे दाखल केले. त्यातील भांडारकर, पुरोहित, सातफळे आणि तट्टे या चौघांच्या निवासस्थानी एसीबीच्या पथकाने शनिवारपासून झडती घेतली.
झडतीत या अधिकाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात बेहिशेबी मालमत्ता असल्याचे उघड झाले. (प्रतिनिधी)
मालमत्ता, कागदपत्रांची लपवाछपवी
एसीबीने गुन्हे दाखल करून घरझडती घेण्यास प्रारंभ केल्यामुळे या प्रकरणातील आरोपी सतर्क झाले आहेत. त्यांनी आपली रोकड तसेच बेहिशेबी मालमत्ता दडविण्यासाठी जोरदार प्रयत्न चालविले आहे. याचमुळे सातफळे आणि तट्टे यांच्याकडे एसीबीच्या अधिकाऱ्यांना किरकोळ मालमत्ता असल्याची कागदपत्रे मिळाली. दरम्यान, या आणि अशाच कोणत्याही गैरव्यवहाराची माहिती असल्यास एसीबीच्या अधिकाऱ्यांसोबत संपर्क करावा, असे आवाहन एसीबीचे अधीक्षक प्रकाश जाधव यांनी केले आहे. त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असेही जाधव यांनी स्पष्ट केले आहे.
कुणाकडे काय सापडले!
वासुदेव भांडारकर सध्या जवाहरनगर (सुभेदार लेआऊट) मध्ये राहतात. त्यांच्याकडे १ कोटी, ३० लाखांची बेहिशेबी मालमत्ता सापडली. त्यात त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी केलेली गुंतवणूक, मुदत ठेवी आणि विमा पॉलिसी ६४ लाख, ८१ हजार. घर, सदनिका आणि इतर स्थावर संपत्ती ४० लाख, ७५ हजार तसेच २५ लाखांच्या वाहने, फर्निचर आणि उपकरणाचा समावेश आहे.
नंदकिशोर पुरोहित बजाजकमल अपार्टमेंट, आयचित मंदिराजवळ, नागपूर यांच्याकडे तूर्त १० लाखांच्या संपत्तीची कागदपत्रे एसीबीच्या हाती लागली.
दिलीप सातफळे हे बेसा येथील पद्मावती नगरात राहातात. त्यांच्याकडूनही ५ लाखांच्या बेहिशेबी मालमत्तेची कागदपत्रे एसीबीच्या हाती लागली.
प्रकाश तट्टे हे अमरावती येथील रोहिणी पार्कच्या मागे कृष्णप्रकाश, शुभम लेआऊटमध्ये राहातात. त्यांच्याकडे एसीबीला १ लाखाची रोकड, ७ लाखांचे सहकारी बँकेचे धनादेश अन्य ४ लाखांची मालमत्ता, याशिवाय २५ लाखांचे त्यांचे निवासस्थान, या मालमत्तेची माहिती हाती लागली.