चकमकीत जहाल नक्षलवादी ठार, १२ बोअर रायफल जप्त
By Admin | Updated: June 29, 2016 21:45 IST2016-06-29T21:45:39+5:302016-06-29T21:45:39+5:30
पोलीस दलाचे विशेष अभियान पथक नक्षलविरोधी अभियान राबवित असताना बुधवारी दुपारी १२.३० ते १ वाजताच्या सुमारास झालेल्या चकमकीत एक पुरूष नक्षलवादी ठार झाला आहे.

चकमकीत जहाल नक्षलवादी ठार, १२ बोअर रायफल जप्त
ऑनलाइन लोकमत
एटापल्ली (गडचिरोली ) : एटापल्ली तालुक्यातील हेडरी पोलीस मदत केंद्राच्या हद्दित बोडमेटा- मर्दहूर जंगल परिसरात गडचिरोली पोलीस दलाचे विशेष अभियान पथक नक्षलविरोधी अभियान राबवित असताना बुधवारी दुपारी १२.३० ते १ वाजताच्या सुमारास झालेल्या चकमकीत एक पुरूष नक्षलवादी ठार झाला आहे. त्याचा मृतदेह हस्तगत करण्यात पोेलीस दलाला यश आले आहे.
बोडमेटा- मर्दहूर जंगलात नक्षलविरोधी अभियान सुरू असताना नक्षलवाद्यांनी पोलीस पथकावर जोरदार हल्ला केला. यावेळी दोनही बाजुंनी अंदाधुंद गोळीबार झाला. पोलिसांनीही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. या चकमकीत एक जहाल पुरूष नक्षलवादी मारल्या गेला आहे. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी जंगलाच्या दिशेने पळून गेलेत. त्यानंतर घटनास्थळावर एक पुरूष मृतदेह व एक बारा बोअर रायफल यासह नक्षलसाहित्य मोठ्या प्रमाणावर मिळाले आहे. मृत नक्षलवाद्याची अद्याप ओळख पटली नसल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी दिली आहे. या घटनेनंतर हेडरी पोलीस मदत केंद्राच्या हद्दित नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आले आहे, अशी माहितीही देशमुख यांनी दिली. (तालुका प्रतिनिधी)