मालेगाव स्फोटाची कागदपत्रे गहाळ!
By Admin | Updated: April 8, 2016 02:47 IST2016-04-08T02:47:16+5:302016-04-08T02:47:16+5:30
मालेगावमध्ये मध्ये २००८ मध्ये झालेल्या स्फोटातील महत्वाच्या साक्षीदारांचे न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर नोंदविले गेलेले अत्यंत महत्वाचे पुरावे ठरतील असे जबाब विशेष

मालेगाव स्फोटाची कागदपत्रे गहाळ!
मुंबई : मालेगावमध्ये मध्ये २००८ मध्ये झालेल्या स्फोटातील महत्वाच्या साक्षीदारांचे न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर नोंदविले गेलेले अत्यंत महत्वाचे पुरावे ठरतील असे जबाब विशेष न्यायालयातून गहाळ झाल्याची माहिती पुढे आली आहे. हा मुद्दा आज विधानसभेत उपस्थित झाला असता सरकारने यावर निवेदन करावे, असे निर्देश तालिका अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी दिले.
२९ सप्टेंबर २००८ या दिवशी मालेगावच्या भिक्कू चौकात दोन स्फोट झाले होते. यात सात लोकांचा मृत्यू तर ८० लोक जखमी झाले होते. या बॉम्बस्फोटाचा तपास राज्याच्या दहशतवाद विरोध पथकाकडे असताना त्यांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर आणि भारतीय लष्कराचा अधिकारी लेफ्टनंट श्रीकांत पुरोहित यांचा समावेश होता. ते दोघेही ‘अभिनव भारत’ या हिंदू मुलतत्ववादी संघटनेसाठी काम करत होते, असा त्यांच्यावर आरोप आहे. २०११ मध्ये या प्रकरणाचा तपास ‘एनआयए’ या राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे आला.
या प्रकरणातील महत्वाच्या साक्षीदारांचे जबाब असलेली कागदपत्रे गहाळ झाली असल्याची माहिती विशेष सरकारी वकील रोहिणी सालियान यांनी एका
इंग्रजी वर्तमानपत्राला दिल्याने खळबळ उडाली आहे. कागदपत्रे न्यायालयातून गहाळ असल्याच्या प्रकरणाचे पडसाद आज विधानसभेतही उमटले. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून या प्रकरणी
राज्य सरकारने निवेदन करावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड आणि गटनेते जयंत पाटील यांनी केली. (विशेष प्रतिनिधी)