मध्यरात्री अश्रुंचा बांध फुटला

By Admin | Updated: February 21, 2015 02:11 IST2015-02-21T02:07:50+5:302015-02-21T02:11:56+5:30

अण्णांच्या संघर्षाची अखेर : निधनाचे वृत्त समजताच कोल्हापूरवासियांना जबर धक्का

Midnight tears burst | मध्यरात्री अश्रुंचा बांध फुटला

मध्यरात्री अश्रुंचा बांध फुटला

विश्वास पाटील - कोल्हापूर -- ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे उर्फ कोल्हापूरचे ‘अण्णा’ यांचे निधन झाल्यावर मध्यरात्रीही कोल्हापूरला हुंदका अनावर झाला. पानसरे अण्णांनी प्रत्येकाला लढायला शिकवले, रडायला नाही. परंतु तुमच्या आठवणींनी हुंदका आवरणे कठीण असल्याचे सांगून कार्यकर्त्यांनी तर हंबरडाच फोडला.
आज, शुक्रवारी दुपारपासूनच कोल्हापुरात पानसरे अण्णांना मुंबईला हलविणार असल्याची बातमी प्रत्येकाच्या तोंडात होती. ती ऐकून अण्णा कसे आहेत हो अशी विचारणा लोक आस्थेनेच करत होते. दुपारी त्यांना मुंबईला हलविल्यावर आता त्यांच्यावर चांगले उपचार होतील व अण्णा परत येतील असेच प्रत्येकाला वाटत होते. कारण लढाऊ बाणा हेच अण्णांचे जीवन होते. त्यामुळे मृत्यूलाही ते सहजासहजी शरण जाणार नाहीत. ते या हल्ल्यातून वाचावेत व एकदा त्यांचे खणखणीत भाषण ऐकायला मिळावे अशी सर्वांचीच इच्छा होती; परंतु नियतीने ती कायमचीच अपुरी ठेवली.
रात्री अकरानंतर सोशल मीडियासह मोबाईलवर दबक्या आवाजात पानसरे यांच्या मृत्यूच्या बातमीची चाहूल सुरू झाली. ती खात्री करून अनेकांनी अफवा असल्याचे जाहीर केले. कित्येकांनी तर अण्णांना माझे आयुष्य लाभो असे देवाला साकडे घातले. परंतु देव तरी किती निष्ठुर, त्याने कुणाचेच ऐकले नाही. त्याला जे करायचे होते तेच केले आणि अण्णांची इहलोकीची यात्रा संपवली.
मध्यरात्रीची वेळ असूनही दसरा चौक, बिंदू चौक, कम्युनिस्ट पक्षाच्या आॅफिससमोर तसेच लक्ष्मीपुरीतही लोकांची चौकाचौकांत गर्दी झाली. प्रत्येकजण पानसरे यांच्या आठवणी सांगत होते. निधनाबद्दल दु:ख व्यक्त करतानाच मारेकरी अजून मोकाट असल्याने त्याबद्दलही संताप व्यक्त होत होता. रात्र असल्याने सगळ््यांनाच घराबाहेर पडता आले नाही. म्हणून दु:खाचा हुंदका त्यामुळे थांबला नाही. रात्रीचा अंधारही त्या हुंदक्याने गदगदून गेला. पानसरे अण्णा नाहीत, तर या जगावरील अंधारही तसाच कायम राहावा, अशी वेदनेची सलही त्यातून भेदून गेली. कुणाचे कोण असलेल्या, मध्यरात्री रस्त्यावर उभे राहून देहविक्री करणाऱ्या महिलांच्या डोळ््यांतही निधनाचे वृत्त ऐकून अश्रू तरळले.
बिंदू चौक, शाहू स्मारकपासून ते बँक, तहसीलदार कार्यालय, श्रमिक कार्यालयापासून ते शिवाजी विद्यापीठापर्यंत कोल्हापुरात अशी एकही जागा नाही की जिथे पानसरे अण्णा कधी ना कधी जाऊन बोललेले नाहीत, प्रश्न मांडलेला नाही. या सगळ््या निर्जीव जागाही पानसरे यांच्या निधनाचे वृत्त ऐकून क्षणभर थबकल्या.


दुर्देवी योगायोग !
पुणे येथे अज्ञात हल्लेखोरांनी २० आॅगस्ट २०१३ रोजी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळीबार केला होता. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्या मारेकऱ्यांचा शोध अद्यापही लागलेला नाही. त्यातच पुरोगामी विचारांचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर १६ फेब्रुवारी २०१५ रोजी गोळीबार झाला. पाच दिवसापासून मृत्यूशी झूंज देणारे पानसरे यांची प्राणज्योत २० तारखेलाच मालवली. २० तारखेचा हा दुर्देवी योगायोग पुरोगामी महाराष्ट्राच्या वाट्याला यावा हे वाईटच...

पानसरे यांच्या घरासमोर नीरव शांतता
ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे व त्यांच्या पत्नी उमाताई यांच्यावर सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास सागरमाळ परिसरातील त्यांच्या घराशेजारीच हल्ला झाला होता. त्यानंतर त्यांना उपचारासाठी जवळच असणाऱ्या अ‍ॅस्टर आधार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. गेल्या पाच दिवसांपासून या दाम्पत्यावर या ठिकाणी उपचार सुरू होते. तेव्हापासून त्यांची सून, नातू, मुली असे कुटुंबीय हॉस्पिटलमध्येच होते. शुक्रवारी सायंकाळी पानसरे यांना मुंबईतील ब्रीच कॅँडी हॉस्पिटल येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. त्यांच्यासोबत सुन मेघा पानसरे होत्या. या ठिकाणी रात्री उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. त्यांचे उर्वरित कुटुंब ‘आधार’मध्येच आहे. पानसरे यांचे निधन झाल्यानंतर मध्यरात्री पाऊण वाजता त्यांच्या घरासमोर नीरव शांतता होती. बंदोबस्ताला असलेले पोलीस झोपलेले होते. लुंगी व बनियनवर फिरायला बाहेर पडलेले अण्णा अखेर घरी परतलेच नाहीत.

Web Title: Midnight tears burst

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.