मध्य वैतरणा ओव्हरफ्लो नाहीच

By Admin | Updated: September 19, 2015 22:50 IST2015-09-19T22:50:50+5:302015-09-19T22:50:50+5:30

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलाव क्षेत्रांपैकी मध्य वैतरणा हा तलाव शनिवारी ओव्हरफ्लो झाल्याच्या वावड्या उठल्या; मात्र रात्री उशिरा महापालिका प्रशासनाने खडबडून जागे

Middle Vatarna Overflow No | मध्य वैतरणा ओव्हरफ्लो नाहीच

मध्य वैतरणा ओव्हरफ्लो नाहीच

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलाव क्षेत्रांपैकी मध्य वैतरणा हा तलाव शनिवारी ओव्हरफ्लो झाल्याच्या वावड्या उठल्या; मात्र रात्री उशिरा महापालिका प्रशासनाने खडबडून जागे होत मध्य वैतरणा धरण ओव्हरफ्लो झाले नसल्याचे स्पष्ट केले.
महापालिकेने सातही तलावांतील पाण्याची पातळी वाढत नसल्याने निवासी आणि औद्योगिक क्षेत्रांसाठी अनुक्रमे २०, ५० टक्के पाणीकपात लागू केली आहे. तर सप्टेंबरच्या उत्तरार्धात होत असलेल्या पावसाने तलावांतील पाण्याची पातळी वाढेल, अशी आशा अद्यापही महापालिकेला आहे. दुसरीकडे शुक्रवारी राज्यात झालेल्या पावसाने दिलासा दिला असतानाच शनिवारी सकाळपासूनच व्हॉट्स अ‍ॅपवरून मध्य वैतरणा ओव्हरफ्लो झाल्याच्या वावड्या उठू लागल्या. त्यांनी एवढा वेग पकडला की मुंबईवरील जलसंकट मिटणार; अशा आशयाच्या संदेशांनी धुमाकूळ घातला.
अखेर यावर महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी प्रमुख तलावांपैकी मोडक सागर धरणापासून शहराला जलवाहिन्यांद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मोडक सागर धरणातील पाण्याची पातळी स्थिर राहण्यासाठी मध्य वैतरणा आणि अपर वैतरणा धरणाचे दरवाजे उघडून नियमित स्वरूपात पाणी घेण्यात येते. १९ सप्टेंबर रोजी याच प्रकारे वैतरणा धरणातून मोडक सागर धरणात पाणी सोडण्यात आले.
शिवाय शनिवारच्या आकडेवारीनुसार, मध्य वैतरणा धरण भरलेले नाही, असे महापालिका प्रशासनाने म्हटले आहे. (प्रतिनिधी)

मुसळधार पावसाचा इशारा कायम..
मुंबई वगळता शुक्रवारी राज्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले असतानाच पुढील ७२ तासांसाठी राज्याला देण्यात आलेला मुसळधार पावसाचा इशारा कायम आहे; तर मुंबईत पुढील ४८ तासांत अधून-मधून पावसाच्या सरी कोसळतील आणि काही भागात मुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे.
राजस्थान, पंजाब व हरियाणाच्या काही भागातून परतलेल्या मान्सूनची सीमा शनिवारीही कायम आहे; तर दुसरीकडे विदर्भ आणि लगतच्या भागावर असलेल्या खोल दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झाली आहे. त्याचे रूपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात झाले आहे; शिवाय आता ते उत्तर मध्य महाराष्ट्र आणि लगतच्या नैर्ऋत्य मध्य प्रदेश व गुजरातवर आहे.
मागील २४ तासांत मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला आहे; तर गोवा आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडल्याचे हवामान खात्याच्या वतीने सांगण्यात आले.

Web Title: Middle Vatarna Overflow No

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.