भंगार अड्ड्यांमुळे एमआयडीसीत धोका

By Admin | Updated: January 21, 2017 03:32 IST2017-01-21T03:32:56+5:302017-01-21T03:32:56+5:30

महाड औद्योगिक वसाहतीमध्ये आठ ठिकाणी मोकळ्या जागेत आणि बंद कारखान्यामध्ये भंगार व्यवसाय चालू आहे.

MIDC risk in scratches due to scratches | भंगार अड्ड्यांमुळे एमआयडीसीत धोका

भंगार अड्ड्यांमुळे एमआयडीसीत धोका

सिकंदर अनवारे,

दासगाव- महाड औद्योगिक वसाहतीमध्ये आठ ठिकाणी मोकळ्या जागेत आणि बंद कारखान्यामध्ये भंगार व्यवसाय चालू आहे. अनधिकृत आणि विनापरवाना अशा प्रकारे या भंगार व्यावसायिकांकडे येथील औद्योगिक वसाहत प्रशासन, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. २०१५ मध्ये भंगाराच्या अड्ड्यावर वायुगळती होवून पाच जणांचा मृत्यू झाला होता. मात्र या दुर्घटनेचा येथील स्थानिक प्रशासनाला विसर पडला आहे. या घटनेनंतर औद्योगिक वसाहतीतील बंद कारखान्यामध्ये सुरू असलेले भंगार अड्डे बंद केले. परंतु बंद करत असताना या भंगार व्यावसायिकांनी कमाई होणाऱ्या वस्तू घेत अनेक घातक रसायन तेथे बेवारस सोडून दिल्याने या रसायनामुळे औद्योगिक वसाहतीमध्ये धोका निर्माण झाला आहे.
महाड औद्योगिक वसाहतीमध्ये जून २०१५ मध्ये सी झोनमधील एका भंगाराच्या अड्ड्यावर अनधिकृत रसायन हाताळत असताना विषारी वायू तयार झाला होता. या वायुगळतीमध्ये निष्पाप पाच कामगारांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर सर्वच प्रशासनाची धावपळ उडाली होती. अनधिकृत थाटलेले बंद कारखान्यातील भंगार व्यवसाय आणि त्यातून केली जाणारी रसायनाची हाताळणी हा मुद्दा ऐरणीवर आला होता. या दुर्घटनेची दखल घेत महाड औद्योगिक वसाहत प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाची बंद कारखाना आणि मोकळ्या जागी सुरू असलेल्या सर्व भंगार व्यवसायावर कारवाई सत्र सुरू केले. नोटिसा बजावल्या आणि या भंगार व्यावसायिकांनी औद्योगिक वसाहतीची जागा सोडून लगतच्या गावामध्ये आश्रय शोधला.
२०१५ च्या या दुर्घटनाला आज दीड वर्ष पूर्ण होवून देखील भंगार अड्ड्यांवरील ही घातक रसायने तशीच पडून आहेत. औद्योगिक क्षेत्रातील सर्वच जमीन ही महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या नावावर असून कारखानदार अगर व्यावसायिक हे केवळ भाडोत्री आहेत. जागेचा वापर करण्याबाबत औद्योगिक वसाहत आणि कारखानदार यांच्यामध्ये करार केला जातो. औद्योगिक वसाहत प्रशासनाच्या संमतीशिवाय या जागा कोणालाही भाड्याने देता येत नाही, असे असताना कारखान्याच्या जागांवर भंगार अड्ड्याचा वापर आणि पोट भाडोत्री असे दोन नियमबाह्य प्रकार या ठिकाणी घडत असून देखील याची कोणतीच दखल येथील स्थानिक प्रशासनाकडून घेतली जात नाही. नियमानुसार या जागा मालकांकडून काढून घ्यावयास पाहिजे. मात्र या भंगार व्यावसायिकांपुढे प्रशासनाचे अधिकारी नामोहरम झाल्याप्रमाणे वागत आहेत.
>रस्त्यालगत भंगार
जिते गावाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगत सी झोनमध्ये दोन इप्का कारखान्यासमोर एक आणि महाड औद्योगिक वसाहत कार्यालयाच्या मागच्या बाजूस, बिरवाडी रस्त्याकडे तीन असे येथे आठ भंगार अड्डे महाड औद्योगिक क्षेत्रात आहेत. मात्र जिते गावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत भंगार अड्ड्याला कोणतेही संरक्षण नाही. या अड्ड्यावर केमिकल पिंप, प्लास्टीक बॅगामध्ये मोठ्या प्रमाणात ओली आणि सुकी रसायने बेवारस पडली आहेत. अशा भंगार अड्ड्यांवर कारवाईची गरज आहे. मात्र तशी मानसिकता अधिकाऱ्यांची दिसून येत नाही. या प्रकरणी महाड औद्योगिक वसाहतीचे कनिष्ठ अभियंता एस. बी. उबाले यांच्याशी संपर्क साधला असता याबाबत काहीच माहीत नाही आणि हा विषय आमच्या अखत्यारीत नाही, असे सांगत मी तुम्हाला माहिती देवू शकत नाही, असे सांगून उबाले यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे बोट दाखवत हात वर केले.
>कामगारांची मागणी : दोन्ही कार्यालयीन अधिकारी जबाबदारी झटकत असले तरी दोन्ही कार्यालयाची जबाबदारी महाड औद्योगिक वसाहतीवर तेवढीच आहे. जिते गावचे रस्त्यावर असलेल्या या बंद भंगाराच्या अड्ड्यावर बेवारस पडलेले घातक रसायन हे मोठ्या प्रमाणात परिसराला धोकादायक आहे. याच्या चौकशीची मागणी कामगारांकडून होत आहे.
>औद्योगिक वसाहतीमधील जमिनीची मालकी आणि सर्व अधिकार औद्योगिक विकास महामंडळाचे आहेत. त्यांनी या प्रकरणी कारवाई करणे अपेक्षित आहे. तसे पत्र आमच्या कार्यालयाकडून त्यांना देण्यात आले आहे. कार्यालयीन सहकार्य आमच्या कार्यालयाकडून केले जाईल.
- अमित लाटे, क्षेत्र अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाड

Web Title: MIDC risk in scratches due to scratches

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.