म्हसळा शहरातील तीन दुकाने फोडली
By Admin | Updated: July 22, 2016 02:09 IST2016-07-22T02:09:29+5:302016-07-22T02:09:29+5:30
शहरातील पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बाजारपेठेतील मिरची गल्लीत बुधवारी रात्री चोरट्यांनी तीन दुकाने फोडली

म्हसळा शहरातील तीन दुकाने फोडली
म्हसळा : शहरातील पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बाजारपेठेतील मिरची गल्लीत बुधवारी रात्री चोरट्यांनी तीन दुकाने फोडली तर कुंभारवाड्यातील एक घर फोडण्याची घटना घडली. दहा दिवसांतील चोरीची ही दुसरी घटना असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
बुधवारी रात्री शहरातील कुंभारवाडा येथील नौशाद तेरवीळ यांच्या राहत्या घरी ५७ हजार रुपये किमतीचा सिगारेटचा माल चोरट्यांनी चोरून नेला. या घटनेचा म्हसळा पोलीस तपास करीत असतानाच दुसऱ्या दिवशी गुरु वारी मध्यरात्री म्हसळा पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बाजारपेठेतील मिरची गल्लीत दोन दुकाने फोडली. कधीकाळी जिल्ह्यात सर्वात कमी गुन्ह्याचे प्रमाण होते तेथे रोजच्या गुन्ह्यांचा आलेख चढता आहे. म्हसळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तसेच उप विभागीय अधीक्षक दत्ता नलावडे यांच्याकडे विचारणा केली असता म्हसळा पोलीस ठाण्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याचे सांगितले. रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी म्हसळा पोलीस ठाण्यातील अपुरे अधिकारी व कर्मचारी असल्याने नवीन नियुक्तीबाबतीत गंभीरतेने दखल घेण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. (वार्ताहर)