वागळेत म्हाडा उभारणार एक हजार बेडचे रुग्णालय, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 17:41 IST2020-05-23T17:41:03+5:302020-05-23T17:41:54+5:30

ठाणे शहरात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने आता वागळे इस्टेट भागात १ हजार बेडचे, मुंब्य्रात ५०० बेडचे रुग्णालय उभारण्याचे निश्चित करण्यात आले आहे. तर कळव्यात ५०० बेडसाठी जागेचा शोध सुरु असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

MHADA to set up a 1,000-bed hospital in Wagle, informed Housing Minister Jitendra Awhad | वागळेत म्हाडा उभारणार एक हजार बेडचे रुग्णालय, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची माहिती

वागळेत म्हाडा उभारणार एक हजार बेडचे रुग्णालय, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची माहिती

ठाणे : ठाणे शहरात कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने हॉस्पीटलमधील बेडची संख्या आता अपुरी पडू लागली आहे. ग्लोब्लह इम्पॅक्ट हब येथे १ हजार बेडच्या रुग्णालयाचे काम सुरु असतांना आता वागळे इस्टेट भागात एका खाजगी कंपनीच्या गोडावूनच्या ठिकाणी म्हाडाच्या वतीने १ हजार बेडचे रुग्णालय उभारण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिली. तर मुंब्य्रात ५०० बेडचे आणि कळव्यात ५०० बेडसाठी जागेचा शोध सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.
               ठाण्यात दिवसेंदिवस कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे. रोज नवीन १०० हून अधिक रुग्ण कोरोनाचे शहरात आढळत आहेत. त्यामुळे आतापर्यंत ही संख्या १८०० च्या घरात गेली आहे. शहरातील पाच खाजगी रुग्णालयातील बेड यासाठी आरक्षित ठेवण्यात आले आहेत. तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयातील देखील कोरोना बाधीत रुग्णांना उपचार सुरु आहेत. परंतु कोरोनाचा प्रार्दुभाव आता झोपडपटटी भागात अधिक होऊ लागला आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या ही दिवसागणिक वाढत आहे. यावर अंकुश ठेवण्यासाठी महापालिका स्तरावर विविध उपाय योजना केल्या जात आहेत. परंतु तरीही रुग्णांची संख्या कमी होतांना दिसत नाही. त्यात आता येत्या काही दिवसात पावसाळा सुरु होईल अशा काळात रुग्णांचे अधिक हाल होण्याची शक्यता नाकारात येत नाही. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी नवीन तात्पुरत्या स्वरुपातील रुग्णालये सुरु करण्यासाठी शनिवारी गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांच्या निवास्थानी महापालिका आयुक्त विजय सिंघल यांच्या उपस्थितीत या संदर्भात महत्वाची बैठक पार पडली. यावेळी म्हाडाच्या वतीने वागळे इस्टेट भागात एका खाजगी कंपनीच्या गोडावूनच्या ठिकाणी तब्बल १ हजार बेडचे रुग्णालय उभारण्याचे प्रस्तावित असल्याचे आव्हाड यांनी सांगितले. त्याचे नियोजन आता युध्द पातळीवर सुरु झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. लवकरात लवकर हे रुग्णालय सुरु होईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
दुसरीकडे कळवा, मुंब्रा भागातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. परंतु मुंब्य्रात एकच रुग्णालय असल्याने उर्वरीत रुग्णांना ठाण्याच्या दिशेने धाव घ्यावी लागत आहेत. त्यामुळे रुग्णांना त्यांच्याच भागात उपचार मिळाल्यास ते सोईचे ठरणार आहे. त्या अनुषंगाने आता मुंब्य्रात एका शाळेत ५०० बेडचे रुग्णालय उभारण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे मुंब्य्रातील रुग्णांना आता जवळच उपचार घेणे शक्य होणार आहे. तिकडे कळव्यातही ५०० बेडचे रुग्णालय सुरु करण्याचा विचार सुरु आहे. पंरतु या ठिकाणी जागेचा अभाव आहे, मैदानाचा विचार सुरु होता, परंतु पावसाळ्यात रुग्णांचे तेथे हाल होऊ शकतात. त्यामुळे कळव्यात इतर कुठे जागा मिळते का? याचा शोध सुरु असल्याचेही माहिती आव्हाड यांनी दिली.

 

Web Title: MHADA to set up a 1,000-bed hospital in Wagle, informed Housing Minister Jitendra Awhad